'...तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही'; नागपूर पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसची सत्यशोधन समिती आक्रमक
By कमलेश वानखेडे | Updated: March 22, 2025 16:55 IST2025-03-22T16:54:05+5:302025-03-22T16:55:22+5:30
नागपूर पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास समितीला परवानगी नाकारली. त्यानंतर राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.

'...तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही'; नागपूर पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसची सत्यशोधन समिती आक्रमक
-कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन जाऊन घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीला शनिवारी (२२ मार्च) नागपूर पोलिसांनी रोखले. या समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. या घटनेत फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का दाखल करण्यात आले? ज्यांनी लोकांच्या भावना भडकावल्या त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना का सोडून देण्यात आले? असे सवाल काँग्रेसच्या सत्य शोधन समितीचे अध्यक्ष तसेच गोव्याचे माजी प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले. राज्यातील शांतता संपविणारे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने रविभवनात बैठक घेतली. या वेळी समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह समितीचे सदस्य साजिद पठाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे आदी उपस्थित होते.
तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही -ठाकरे
यावेळी माणिकराव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'या घटनेमागील सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही नागपुरात आलो आहोत. मात्र, पोलिसांनी संचारबंदीचे निमित्त समोर करीत आम्हाला रोखले. मात्र, सत्य जाणून घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही. त्यासाठी चार दिवस नागपुरात थांबावे लागले तरीत चालेल. या दंगतील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय राहिली याचीही माहिती घेऊ, काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांशीही चर्चा करू. यानंतर समिती आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करेल.'
यावेळी अतुल लोंढे, गिरीश पांडव, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.
दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जबाबदर
समितीने त्या भागात वास्तव्यास असलेल्यांसह विविध लोकांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जबाबदर असल्याचे स्पष्ट होते. आंदोलनात कुराणाचे आयात असलेली चादर जाळण्यात आली. त्यामुळे मुस्लिमांचा भावना दुखावल्या. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कार्यवाही केली नाही. जुजबी कलमा लावून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले, असा आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरही राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली.
मंत्रीच दंगलीस चिथावणी देत आहेत
राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सराकामधील मंत्रीच दंगलीस चिथावणी देऊन लोकांना भडकविण्याचे काम करीत आहेत. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राज्यातील शांतता संपविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.