लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल मार्गावर राहणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. विजय यादवराव चौधरी (वय ५७) असे मृत पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर सोमवारी सकाळी पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले.
नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष शाखेत चौधरी कार्यरत होते. ते काटोल मार्गावरील वास्तुशिल्प कॉलनीत राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यातून ते बरे झाले मात्र त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. त्यांच्या विनंतीवरून त्यांना वरिष्ठांनी विशेष शाखेत नियुक्ती दिली होती. प्रकृती साथ देत नसल्याने ते नैराश्याने ग्रासले होते. रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे ते त्यांच्या शयनकक्षात झोपले. मात्र त्यांना झोप आली नसावी. पहाटे ५ पर्यंत त्यांची हालचाल सुरू होती. घरच्यांचा डोळा लागल्यानंतर पत्नी वर्षा सकाळी ६ वाजता जागी झाली तेव्हा त्यांना विजय चौधरी झुल्याच्या पाईपला साडीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आरडाओरड केली. मुलांना आणि शेजाऱ्यांना ही घटना माहिती झाली. त्यानंतर गिट्टीखदान पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार सुनील चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. घरच्यांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता चौधरी यांनी एक चिठ्ठी देवघरासमोर लिहून ठेवल्याचे दिसले. प्रकृती साथ देत नसल्याने आणि व्यक्तिगत कारणांमुळे त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज चिठ्ठीतून पोलिसांनी बांधला आहे.
मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्नशील
चौधरी यांना मुलगी (बीई) आणि मुलगा (बीकॉम) आहे. त्यांना निवृत्तीपूर्वी नोकरी मिळावी म्हणून चौधरी प्रयत्नशील होते. त्यात त्यांना यश येत नव्हते. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने नोकरीच्या संधी पुन्हा कमी झाल्यामुळे चौधरी मानसिकरीत्या खचल्यासारखे झाले होते, असे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले आहे.