नागपूर : वर्दळीच्या ठिकाणी समारंभात चोरीच्या घटना काही नव्या नाही. तसेच, चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. परंतु, कधी-कधी चमत्कारही घडून येतात. असाच एक किस्सा या लग्नसमारंभात घडला. पोलिसांनी भन्नाट आयडिया केली अन् सात तोळ्यांचा चोरी गेलेला हार महिलेला परत मिळवून दिला.
बुधवारी रात्री बहादुरातील एका लॉनमध्ये एक लग्नसमारंभ पार पडले. नवरीच्या पाठवणीचा कार्यक्रम पार पडला आणि सर्व पाहुणे घरी जाण्याच्या तयारीत होते. इतक्यात आरडाओरड सुरू झाली. काटोल येथील एका महिलेचा सात तोळ्यांचा जवळपास साडेतीन लाख रुपये किमतीचा हार चोरीला गेला होता. तिने नातेवाईकांना विचारपूस केली पण कुणालाच काही माहित नव्हते.
या लग्नसमारंभात २०० हुन अधिक पाहुण्यांची उपस्थिती होती. महिलेने तिचा हार एका पिशवीत काढून ठेवला होता. पाठवणीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पाहुणेही निघायच्या तयारीत होते. तीदेखील निघणार होती, त्याआधी तिने आपल्याजवळील वस्तू तपासून पाहिल्या असता पिशवीतील हार चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सर्वांना विचारले पण काहीच झाले नाही. शेवटी पोलिसांना कळविण्यात आले.
पोलीस सदर स्थळी पोहोचले. यावेळी नवरीच्या वडिलांनी नातेवाईकांची बदनामी व लग्नकार्यात डाग नको म्हणून पोलिसांना विनंती केली. पोलिसांनीही वधूच्या वडिलांच्या विनंतीचा मान ठेवत एक शक्कल लढवली. त्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांना गोळा केले. सभागृहातील एका लहान खोलीकडे बोट दाखवत ज्यानी कुणी हार चोरला असेल त्याने त्या खोलीत असलेल्या गादीखाली तो हार ठेवून बाहेर पडावे, असे म्हटले. असे केल्यास कुणावरही गुन्हा दाखल होणार नाही, असेही सांगितले.
त्यानुसार एक-एक करत सर्व नातेवाईक त्या खोलीत गेले व बाहेर पडले. यानंतर पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता चोरी गेलेला हार गादीखाली मिळून आला. हार परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर लग्नकार्यात आलेले विघ्न कुठलाही वाद न होता टळल्याने वधूपित्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अशाप्रकारे कुणालाही न दुखावता पोलिसांनी शक्कल लढवत या प्रकरणातून तोडगा काढला. पोलिसांच्या या युक्तीचे पोलीस उपायुक्तांनीही कौतुक केले.