लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांवर वचक बसविण्यासाठी शहरातील रस्त्यांवरच नव्हे तर गल्लीबोळांतही पोलीस नजरेस पडतील. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळेल, अशी व्यवस्था शुक्रवारपासून शहरात करण्यात आली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतानाच कुठे काही घडले तर सर्वांत आधी तो तेथे पोहोचायला हवे, या हेतूने ‘क्यू आर (क्विक रिस्पॉन्स) कोड ई बिट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. चोरी, मारामारी, अपघात अथवा कोणताही छोटामोठा गुन्हा घडला तर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचत नाहीत, अशी ओरडवजा तक्रार अनेक वर्षांपासून आहे. या संबंधाने वरिष्ठांकडून संबंधित पोलिसांना विचारणा केल्यास ते वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेतात. हा प्रकार बंद व्हावा, कामचुकार पोलिसांना यापुढे संधी मिळू नये म्हणून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या वर्षी प्रभावी उपाययोजना करण्यासंबंधीचे निर्देश शहरातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्याला अनुसरून १ नोव्हेंबर २०२० पासून परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्यूआर कोड ई बिट सिस्टीम सुरू करण्यात आली. त्यानुसार, सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बिट पॉइंट निश्चित करण्यात आले. तेथे वॉटरप्रूफ क्यूआर कोड बसविण्यात आले. पोलिसांसाठी ‘सुबाहू’ नामक मोबाईल ॲप तयार करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून कर्तव्यावर (गस्तीवर) असलेल्या पोलिसांना सर्व पॉइंटवर विशिष्ट वेळेनंतर जाऊन ऑनलाईन पंचिंग करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे सुबाहूचे ॲडमिन असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणता चार्ली, बिट मार्शल कोणत्या वेळी कुठे आहे, हे तत्काळ कळू लागले. परिणामी दांडी मारण्याच्या प्रकारावर पूर्णता अंकुश बसला आहे. सोबतच कोणताही गुन्हा कुठे घडला तर तातडीने तेथे चार्ली, बिट मार्शल पोहोचत असल्याचेही दिसून आले. क्यूआर कोड ई बिट सिस्टीमचे असे सकारात्मक परिणाम दिसल्याने ३० जुलैपासून ही बिट सिस्टीम शहरात लागू करण्यात आली.
गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी आयुक्तालयातून झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त नुरूल हसन तसेच शहरातील अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे नियंत्रित करण्यात तसेच पोलिसांना अधिक जोमाने कार्यान्वित करण्यात यश मिळेल, असा विश्वास यावेळी वरिष्ठांनी व्यक्त केला.