लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात चोऱ्या-घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या मेरठ (उत्तर प्रदेश) मधील वसिम मकसुदीच्या तसेच पाचपावलीतील कुख्यात जग्या गोखलेच्या टोळीवरही पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली. आणखी १५ टोळ्या पोलिसांच्या रडारवर असून, शहरातून गुन्हेगारांना हाकलून लावण्याच्या मोहिमेचा हा एक भाग असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून शहरात पुन्हा चोरी-घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असतानाच मेरठ पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान गुन्हेगारांची एक टोळी पकडली. या टोळीने नागपुरात अनेक ठिकाणी चोरी - घरफोडी केल्याची कबुली दिली. मेरठ पोलिसांनी ही बाब नागपूर पोलिसांना कळविली. त्यानुसार नागपूरचे पोलीस पथक मेरठला पोहचले. या पथकाने तेथून वसीम शेख नसीम शेख मक्सुदी (वय २१, रा. सराव कसाई मोहल्ला, हापुड), शहनवाज बाबू रंगरेज (वय २१, रा. हापूड), मोहम्मद मोसिन मोहम्मद सगिर (वय २२, रा. सहवास, गजरोला अमरोहा) तसेच मोहम्मद रईस मोहम्मद रफिक कुरेशी (वय २६) या चौघांना ताब्यात घेऊन नागपुरात आणले. या आरोपींनी नागपुरात पाचपावली, जरीपटका, कोराडी, सदर आणि अन्य भागात एकूण २४ चोरी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. हे सर्व लक्षात घेता. जरीपटका पोलिसांनी उपरोक्त आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्याकडे आणि उपायुक्त पोद्दार यांनी त्याला मंजुरी देत अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त गायकर आणि उपायुक्त पोद्दार यांनी सांगितले.अशाच प्रकारे पाचपावलीतील कुख्यात गुंड जगदीश ऊर्फ जग्या गोखले आणि त्याच्या टोळीतील नितेश माहुरे, आकाश पराते, आकाश पिल्लेवान शेखर वर्मा आणि मंगेश ठाकरे या गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली.ही टोळी अनेक दिवसांपासून चोरी-लुटमारीसह विविध गुन्ह्यात सक्रिय आहे. एकाच रात्रीत शहरातील विविध भागात चाकूच्या धाकावर लुटमार करून जग्या आणि त्याच्या टोळीने खळबळ निर्माण केली होती.या गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांना जग्याच्या टोळीचे धागेदोरे गवसले अन् त्यांना अटक करून पोलिसांनी या टोळीवरही मोक्का अंतर्गत कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत उपस्थित होते.नागपुरात चोरी, मेरठमध्ये विक्रीनागपूरसह ठिकठिकाणी चोरी केलेल्या मौल्यवान चिजवस्तू आणि दागिन्यांची मेरठच्या सराफा व्यापाऱ्याला विक्री करून यूपीची टोळी रोकड मिळवत होती. ही माहिती पुढे आल्याने त्या सराफालाही आरोपी करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त गायकर यांनी सांगितले. या टोळीला स्थानिक गुन्हेगारांची मदत होती का, असा प्रश्न विचारला असता त्याची आम्ही कसून चौकशी करीत असल्याचे उपायुक्त पोद्दार यांनी सांगितले.गुन्हेगारमुक्त शहर बनवायचेनागपूरला गुन्हेगारमुक्त शहर बनवायचे आहे, त्यामुळे गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीएसारखी कठोर कारवाई केली जात असल्याचेही ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी कुख्यात गुन्हेगार विजय रतन नागदेवे (वय २५, रा. सुभाननगर, प्रतापनगर) आणि कैलास सुरेश भारद्वाज (रा. शिवनी, मध्यप्रदेश) या टोळीवर मोक्काची कारवाई केली होती, हे विशेष!या संबंधाने बोलताना अतिरिक्त आयुक्त गायकर म्हणाले, शहर पोलिसांकडून आणखी गुन्हेगारांच्या १५ टोळ्यांविरुद्ध मोक्काच्या कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. ते विचाराधीन आहेत. तीन महिन्यात १२ गुन्हेगारांवर एमपीडीए लावून त्यांना कारागृहात डांबण्यात आले तर, ३८ गुन्हेगारांवर हद्दपारीचा आदेश बजावून त्यांना नागपुरातून हाकलून लावण्यात आले आहे. गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा आसूड ओढण्यासाठी पोलीस कसलीही कसर सोडणार नसल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.