नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपावरचा गल्ला लुटण्यासाठी एकाची हत्या करून दुसऱ्याला मृत्यूच्या जबड्यात पोहोचविणारा खतरनाक गुन्हेगार सागर ऊर्फ पाजी कपूरसिंग बावरी याला अटक करण्यासाठी आणि अटक केल्यानंतर आता त्याच्याकडून या थरारक गुन्ह्याचा घटनाक्रम वदवून घेण्यासाठी पोलिसांनी ‘जान की बाजी’ लावली आहे. कारण बावरीला पोलिसांनी ज्या ठिकाणाहून अटक केली, तो पालनपूर गावचा परिसर कंटेन्मेंट झोन अर्थात कोरोनाग्रस्त परिसर होता, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. तेथे मुक्कामी थांबलेल्या बावरीला अटक करून पोलिसांनी नागपुरात आणले त्यामुळे बावरीसोबत चार दिवसांपासून असलेल्या पोलिसांना सर्वप्रथम कोरोना टेस्ट करून घ्यावी लागणार आहे.अत्यंत निर्दयी आणि धूर्त गुन्हेगार असलेल्या सागर बावरीने २१ मेच्या पहाटे हिंगणा एमआयडीसीतील पेट्रोल पंपावर एकाची निर्घृण हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी केल्यानंतर दुचाकीने सुरतला (गुजरात) पळ काढला होता. तिथे पोहोचल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना फोन करून इकडला हालहवाल विचारला. पोलिस आपल्याला अटक करण्यासाठी सुरतकडे निघाल्याची माहिती कळताच तो सुरतहून पालनपूरला गेला. या गावात राहणाऱ्या मावशीकडे तो दोन दिवस मुक्कामी होता. या दोन दिवसात त्याने दरोड्यात लुटलेल्या रकमेतून स्वत:साठी, मावशी आणि मुलांसाठी नवीन कपडे खरेदी केले. खाणेपिणे केले. तो तेथून सटकण्याच्या तयारीत असतानाच तेथे धडकलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. जेथून बावरीला ताब्यात घेतले तो एरिया कोरोनाग्रस्त असल्याची पोलिसांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे एमआयडीसी पोलिस चार दिवसांपासून त्याची बिनधोकपणे चौकशी करीत आहेत; मात्र पोलिसांना चलबिचल करणारे वृत्त आता कळाले. ते म्हणजे, ज्या भागात बावरीला पोलिसांनी अटक केली तो परिसर कोरोनाग्रस्त अर्थात रेड झोन असल्याचे पोलिसांना कळले आहे. त्यामुळे तपास करणारे पोलिस काहीसे बेचैन झाले आहेत; मात्र अशाही स्थितीत ‘जान की बाजी’ लावणाऱ्या पोलिसांनी शुक्रवारी बावरीला सोबत घेऊन या गुन्ह्यात वापरलेली कुºहाड, रॉड तसेच अन्य साहित्य एका नाल्यातून जप्त केले. आता मात्र पोलिसांना सर्वप्रथम खतरनाक बावरी आणि स्वत:चीही कोरोना टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. पीसीआरचा अवधी खूप कमी असल्यामुळे आधी तपास नंतर टेस्ट अशी भूमिका पोलिसांनी स्वीकारली आहे.अगा हे झालेच कसे?पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी नागपूर ते सुरत असा सुमारे ११०० किलोमीटरचा प्रवास बावरीने मोटरसायकलने केला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जिल्ह्याला जोडणाºया प्रत्येक सीमेवर पोलिसांची कडक नाकेबंदी आहे. अशा स्थितीत बावरी एक जिल्हा नव्हे तर अनेक जिल्हे ओलांडून दुसऱ्या राज्यात गेला. त्याला कोणत्याच ठिकाणच्या पोलिसांनी कसे अडविले नाही किंवा कुख्यात बावरीने सर्वच्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा ओलांडताना पोलिसांना कसे चुकविले, हा चक्रावून टाकणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.