बुधवारपासून सुरुवात :गुणी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
ऑनलाईन लोकमत
नागपूर, दि. २५ - शहर पोलिसांच्या वतिने मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘तंत्र टेक्नो एक्स्पो २०१७’ ला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. पोलिसांच्या हायटेक कामकाजाची या प्रदर्शनीतून माहिती दिली जाणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणालाही प्रदर्शनीच्या माध्यमातून वाव दिला जाणार आहे. गुणी विद्यार्थ्यांच्या करियरला या प्रदर्शनीतून भरारी मिळू शकते, असा विश्वास गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी व्यक्त केला.
तीन दिवसीय प्रदर्शनीचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. त्यासंबंधाने पत्रकारांना शर्मा आणि मासिरकर यांनी माहिती दिली. मेट्रो रेल्वे आणि वोडाफोनच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनीत ४० स्टॉल्स राहणार आहेत. त्यात मादक पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, आर्थिक सेल, फिंगर प्रिंट, वायरलेस शाखा, सायबर शाखा आणि फॉरेंसिक सायन्सच्या स्टॉलचाही समावेश आहे. या प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी आणि त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येत रहावा, यासाठी पोलीस खास प्रयत्न करीत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह १५ हजार नागरिकांना व्हॉटस्अॅपवरून निमत्रंण देण्यात आले आहे. ३०० शाळा महाविद्यालयांनाही निमंत्रीत करण्यात आले असून, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांच्या अत्याधुनिक कामकाजाची माहिती मिळावी, त्यांना पोलिसांजवळ असलेल्या अत्याधुनिक हत्यारांसोबत अन्य साधन सुविधांची माहिती मिळावी, हा त्यामागे उद्देश आहे.
कॅशलेस व्यवहार, एटीएम, क्रेडीट कार्डचा वापर, मोबाईल, इंटरनेट, जीपीएस ट्रॅकिंग, ईशासन प्रणाली, आर्थिक फसवणूक, गुन्हेगारी, व्यसनमुक्ती आदी संबंधानेही प्रदर्शनीतून माहिती मिळणार आहे.
पुरस्कारही मिळणार
अनेक आयटी कंपन्यांचे स्टॉल्सही येथे राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीत चांगले प्रदर्शन (प्रकल्प, संकेतस्थळ) सादर केल्यास त्यांना पुरस्कार दिले जातील. सोबतच त्यांचा प्रकल्प एखाद्या कंपनीला उपयुक्त वाटल्यास संबंंधितांच्या करियरसाठी ही गगनभरारी ठरू शकते, असेही शर्मा आणि मासिरकर म्हणाल्या. नागरिकांसह पोलिस विभागातही ईशासन प्रणाली आणि माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
२५ ते २७ जानेवारी असे तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनाला बुधवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. मात्र, उद्घाटन समारंभ सायंकाळी ६ वाजता पार पडणार असून, यावेळी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ शशीकांत चौधरी, क्रिकेटपटू फैज फजल, बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आदी मान्यवर उपस्थित राहतील. प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे, यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जात आहे.