- नरेश डोंगरे नागपूर - उन्हाळ्यात गर्मीपासून प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून महिनाभरापूर्वी रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आलेल्या मिस्टिंग सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे थंडगार हवेची झुळूक आणि पाण्याचा फवारा फेकण्याऐवजी काही ठिकाणी त्यातून टिप टिप पाण्याचे थेंब पडत आहेत.
प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. गर्दीत उभे राहण्याऐवजी प्रवाशांना एटीएममधून ज्याप्रमाणे झटपट पैसे काढता येतात, तशाच प्रकारची मशीन (एटीव्हीएम) लावण्यात आली आहे. जेवणाची थाळी रेल्वेगाडीच्या खिडकीजवळ जाऊन विकली जात आहे. पिण्याचे थंड आणि शुद्ध पाणी रेल्वे प्रवाशांना मोफत पोहोचविले जात आहे. अशातच भयंकर उकाड्यापासून उन्हाळ्यात प्रवाशांना आल्हाददायक गारवा अर्थात थंड पाण्याचा फवारा मिळावा म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर 'मिस्टिंग सिस्टीम' सुरू केली होती. गाडी फलाटावर येताच ही सिस्टम आपोआप सुरू होते. त्यामुळे तीव्र उन्हामुळे हैराण होणाऱ्या प्रवाशांना या थंडगार पाण्याच्या फवाऱ्याने कमालीचा दिलासा मिळतो.
विशेष म्हणजे, या फवाऱ्याने प्रवासी ओले होत नाही. अशा या सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही ठिकाणांहून फवारा येण्याऐवजी पाण्याचे थेंब गळत आहेत. आज रात्री ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी तातडीने दुरुस्ती करून पुढच्या काही तासांत ही सिस्टीम पूर्ववत केली जाणार असल्याचे म्हटले आहे.