लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाजारातील मूल्य आणि कच्च्या तेलाच्या आधारे तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ किंवा कपात करीत असतात. त्याचा बदल शुक्रवारी मध्यरात्री पाहायला मिळाला. शनिवारी प्रति लिटर पेट्रोल ७९.१२ रुपये आणि डिझेल ७० रुपये ८ पैसे दराने विकण्यात आले. १० दिवसांत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ झाली. काही दिवसांत पेट्रोलचे दर ८० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरानुसार भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे प्रत्येक दिवशी ठरविण्यात येतात. याव्यतिरिक्त डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत होणारी वाढ किंवा घसरण या सर्वांवरही पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. सतत होणारी इंधन दरवाढ लक्षात घेता, सामान्यांना दिलासा मिळावा यासाठी पेट्रोल-डिझेल हे जीएसटीअंतर्गत आणण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. तेल कंपन्या पैशात वाढ करून थेट ग्राहकांच्या खिशातून पैसे काढत आहेत. दररोज पैशात होणारी दरवाढ ग्राहकांना जाणवत नसली तरीही सर्वसामान्यांना फटका बसत आहे, तर डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर हळूहळू वाढत आहेत.विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पेट्रोलसाठी आपण जितकी रक्कम मोजतो त्यात ४८.२ टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या कराचा समावेश आहे. डिझेलमध्ये उत्पादन शुल्क आणि व्हॅटचा ३८.९ टक्के वाटा आहे. नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या काळात इंधनाच्या किमती कमी झाल्या. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नऊवेळा उत्पादन शुल्क कर वाढविला. त्यामुळे सरकारच्या उत्पादन शुल्क महसुलात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली.