नागपूर : प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून मध्य रेल्वेनेनागपूर ते पुणे ही विशेष वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रविवार पासून या गाडीला सुरुवात होत आहे. या गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीच्या एक आठवडापूर्वीपासून नागपूर पुणे - कोल्हापूर आणि नागपूर मुंबई मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. दिवाळीचा पाडवा झाला तरी या मार्गावरची गर्दी कमी व्हायचे नाव घेत नाही. प्रवासी प्रचंड संख्येत वाढल्याने विमानाचे प्रवास भाडे आकाशाला गवसणी घालत आहे. खासग प्रवासी बसवाल्यांनी विमानाच्या भाड्याशी स्पर्धा करायला सुरूवात केली आहे. या मार्गावर धावणाऱ्या कोणत्याच ट्रेनमध्ये जागा शिल्लक नाही. शक्य होईल त्या पद्धतीने प्रवासी तिकडे जात आहेत. एसटीचेही तसेच आहे. एसटीच्या नागपूर पुणे मार्गावर ८ बसेस सुरू आहेत. मात्र, प्रवासी आगावू आरक्षण (अॅडव्हॉन्स बुकिंग) करून असल्याने एकाही बसमध्ये सिट उपलब्ध नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आता नागपूर पुणे वन वे स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. रविवारी १९ नोव्हेंबरपासून ही गाडी सुरू होणार आहे. ०११६६ क्रमांकाची ही गाडी नागपूर येथून रविवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता ती पुण्यात पोहचेल. या गाडीला एकूण २२ कोच असतील. त्यात ११ कोच एसी टू टियर, ९ कोच एसी थ्री टियर आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश राहणार आहे. या स्थानकांवर थांबणारनागपूर - पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड चोर मार्ग या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. दे आये दुरूस्त आयेही गाडी दिवाळीच्या किमान आठ दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर प्रवाशांना सेवा मिळाली असती आणि रेल्वेला चांगला महसुल मिळाला असता. मात्र, तसे न करता आता दिवाळीचा पाडवा संपल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केली. ही गाडी नेमकी कधी पर्यंत चालविली जाणार आहे, हे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट होऊ शकले नाही.