नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेची घडी उत्तम राखतानाच गुन्हे सिद्धी, तंत्रज्ञानाचा वापर, कम्युनिटी पुलिसिंग आणि पोलिसांचे हित जोपासून काम करवून घेतल्याबद्दल नागपूर आणि पुणे पोलिसांना बेस्ट पोलीस युनिट अवाॅर्ड घोषित झाला आहे. पोलीस महासंचालनालयातून राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या ठिकठिकाणच्या पोलीस युनिटची मंगळवारी घोषणा करण्यात आली आहे. (Nagpur, Pune Police awarded 'Best Police Unit Award')
२४ तास धावपळ अन् ताणतणावात काम करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने काम करवून घेण्यासाठी पोलीस महासंचालनालयाने काही योजना अंमलात आणल्या. त्यानुसार, राज्यातील सर्वच जिल्हा तसेच आयुक्तालयाच्या पातळीवर दर्जेदार कामगिरीची स्पर्धात्मक तुलना करण्याचे ठरले. त्यासाठी विविध विभागातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती गेल्या वर्षी तयार करण्यात आली होती. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्हे सिद्धीचा दर वाढविणे, तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त गुन्ह्यांचा छडा लावणे, कम्युनिटी पुलिसिंगच्या माध्यमातून लोकांची मने जिंकणे आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलिसांचे हित जोपासून त्यांना तणावमुक्त ठेवून काम करवून घेण्याचे टास्क या समितीने राज्यातील प्रत्येक पोलीस युनिटपुढे ठेवले.
या सर्व पातळीवर दर्जेदार कामगिरी बजावत ‘बी’ कॅटेगिरीत नागपूर तसेच पुणे पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ पटकावला. ‘ए’ कॅटेगिरीत बेस्ट पुलिस युनिटचा अवाॅर्ड पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी पटकावला. याच कॅटेगिरीत दोष सिद्धीत पोलीस आयुक्त नवी मुंबई, तंत्रज्ञानात आणि कम्युनिटी पुलिसिंग अशा दोन कॅटेगिरीत गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी बेस्ट अवाॅर्ड मिळवला. वेलफेअरमध्ये वाशिमने अव्वलस्थान राखले.
‘बी’ कॅटेगिरीत गुन्हे सिद्ध करून आरोपींना शिक्षा देण्याच्या वर्गवारीत मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, तर तंत्रज्ञानाचा सर्वात चांगला फायदा करून घेण्यात पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी बेस्ट युनिटचा अवाॅर्ड पटकावला. कम्युनिटी पुलिसिंगमध्ये पोलीस अधीक्षक सातारा आणि पोलीस अधीक्षक बीड यांनी बाजी मारली.
‘सी’ची घोषणा नाहीए, बी आणि सी कॅटेगिरीत राज्यातील सर्व पोलीस घटकांसाठी ही स्पर्धात्मक कामगिरी वजा स्पर्धा आयोजित होती. त्यानुसार, निवड समितीने आज हा ए तसेच बी बेस्ट कॅटेगिरीचा निकाल जाहीर केला. सी कॅटेगिरीचा निकाल नंतर घोषित करण्याचे नमूद करण्यात आले आहे.