Purushottam Puttewar Death Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच नागपूरातही एका वृद्ध व्यक्तीची गाडीने धडक देऊन हत्या करण्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उजेडात आलं होतं. सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचे असल्याचे वाटलं होतं. मात्र तपासानंतर हा सगळा बनाव रचल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आणखी तपासानंतर या प्रकरणा हळूहळू अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. वृद्ध व्यक्तीची त्यांच्याच सुनेने पैशांसाठी हत्या केल्याची माहिती अखेर पोलिसांनी दिली. सरकारी अधिकारी असलेल्या सूनेनं सुपारी देऊन सासऱ्यांची हत्या केली. या हत्या प्रकरणात महिलेसह तिचा भाऊ आणि हत्या करणाऱ्यांना अटक केली.
पुरुषोत्तम पुट्टेवार असे हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव असून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असे सूनेचं नाव आहे. आरोपी सूनेनं सासऱ्यांची हत्या करण्यासाठी तब्बल १७ लाखांची सुपारी दिली होती. संपत्तीसाठी सासऱ्याला कारनं उडविण्याची सुपारी अर्चना पुट्टेवार यांनी दिली. ड्रायव्हर अर्चना यांनी सार्थक बागडेच्या माध्यमातून त्याचे मित्र निरज निमजे आणि सचिन धार्मिकला सासरे पुरुषोत्तम यांची हत्या करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपींनी पुरुषोत्तम यांना गाडीने उडवले आणि त्यांची हत्या केली. सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचे वाटत होते. मात्र कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केल्यानंतर गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा तपास सुरु केला.
तांत्रिक तपासामध्ये ही हत्या असल्याचे शेवटी उघड झाले. सुपारी देऊन केलेली हत्या आहे हे पोलीस तपासांत समोर आलं. २२ मे रोजी पुरुषोत्त पुट्टेवार हे त्यांच्या आजारी पत्नीला भेट घेऊन घरी जात होते. त्यावेळी मानेवाडा परिसरातील बालाजी नगर इथे एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली. या धडकेनंतर पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यांचा पुट्टेवार यांचा मुलगा आणि अर्चना पुट्टेवारचा पती मनिष पुट्टेवार यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिट अँड रन प्रकरणात कार चालक निरज निमजेला अटक केली.
मात्र पोलिसांना या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला तेव्हा ही हत्या असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील मास्टरमाईंड पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असल्याचं तपासात समोर आलं. अर्चना पार्लेवार पुट्टेवार या गडचिरोलीतील नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत.
आरोपींचे बिंग कसे फुटलं?
अर्चना पुट्टेवार यांच्या चालकाचा मित्र निरज निमजे याच्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले. पुरुषोत्तम यांच्या हत्येसाठी निरजला भरपूर पैसे मिळाले होते. त्यामुळे कधीही कोणालाही दारू न पाजणारा, कधी पार्ट्या न देणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला, महागड्या दारु पिण्यासाठी मित्रांना विचारु लागला होता. त्यामुळे लोकांना त्याच्यावर संशय येऊ लागला. पोलिसांना खबऱ्यांमार्फत त्याच्याकडे भरपूर पैसे आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी निरजला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करताच त्याने ही सुनियोजित हत्या असल्याचे सांगून टाकले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली.