नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) रेल्वेगाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. त्यासाठी श्वानपथकाचाही वापर केला जात आहे. तस्कर आणि चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांच्या सामानावर हात मारू नये म्हणून आरपीएफ आणि जीआरपीचे जवान अलर्ट मोडवर आले आहेत.
उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढते, अर्थात रेल्वेगाड्या भरभरून धावतात. सध्या असेच सुरू आहे. जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडीत प्रवाशांची खचाखच गर्दी दिसून येत आहे. ही संधी साधून समाजकंटकांकडून काही उपद्रव केला जाऊ शकतो. शिवाय प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मद्याची तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणारेही डाव साधून घेण्याच्या तयारीत असतात.चोरटेही सक्रिय होतात. ते लक्षात घेऊन आरपीएफ आणि जीआरपी सक्रीय झाली आहे. प्रत्येक रेल्वेगाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. त्यासाठी श्वानाचाही वापर केला जात आहे. कुठे काही संशयास्पद आढळल्यास लगेच त्या बॅग किंवा वस्तूची तपासणी करून ते सामान कुणाचे आहे, त्या व्यक्तीचीही चौकशी केली जात आहे.
रेल्वेगाडी फलाटावर थांबताच उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांची गेटवर, फलाटावर गर्दी होते. ही संधी साधून चोरटे मोबाईल, पर्स किंवा बॅग चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साध्या वेषातील आरपीएफ, जीआरपीचे जवान रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर घुटमळत असतात. कुणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास लगेच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे आरपीएफने एका आठवड्यात ७ चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीचा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता.