लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेस्थानक परिसरात प्री पेड बुथजवळ बुधवारी रात्री ८ वाजता दोन ऑटोचालकात हाणामारी झाली. एका ऑटोचालकाने दुसऱ्यावर चाकुने वार केला. कालु आणि बादल अशी ऑटोचालकांची नावे आहेत.
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसर कालुने बादलच्या पायावर ३ वार करून त्याला जखमी केले. ही घटना आरपीएफ ठाण्यापासून १०० मिटर अंतरावर घडली. रात्री उशीरापर्यंत लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. भांडण होण्यापुर्वी प्लॅटफार्म क्रमांक ४/५ वर या ऑटोचालकात दुपारी ३.३० वाजता वाद झाला होता. त्यावेळी महाराष्ट्र एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर उभी होती. या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी ते भांडत होते. त्यानंतर ते रेल्वेस्थानकाच्या बाहेर आले. रात्री ८ वाजता कालु चाकु घेऊन रेल्वेस्थानकावर पोहोचला. बादल प्री पेड ऑटो बुथजवळ उभा असल्याची माहिती त्याला समजली. तो तेथे आला आणि त्याने बादलवर चाकुने हल्ला केला. काही ऑटोचालक तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी भांडण सोडविले. बादल रुग्णालयात गेला. कालु घटनास्थळावरून फरार झाला. रेल्वेस्थानकाच्या आत जाऊन प्रवासी घेण्यासाठी ऑटोचालक भांडण करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस सहायक पोलीस निरीक्षक थॉमस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ऑटोचालकांना विचारपुस केली. परंतु ऑटोचालकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करुन माहिती देण्याचे टाळले. परंतु काही ऑटोचालकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेच्या तासभरानंतर या बाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.