लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये नऊ पिंजऱ्यात शेकडो पक्षी कोंबून पार्सल बोगीतून क्रूरपणे त्यांची वाहतूक करण्यात येत होती. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेऊन नागपुरातील पशुप्रेमींना कळविले. त्यामुळे नागपुरात या गाडीतील पक्ष्यांची वाहतूक होत असलेले नऊ पिंजरे गाडीखाली उतरविण्यात आले. यातील जवळपास १०० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. रेल्वे स्थानकावर वन विभागाचे अधिकारी, पशू अधिकारी आणि पशुप्रेमी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.रेल्वेगाडी क्रमांक १२१०२ ज्ञानेश्वरी-कुर्ला एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीतून पक्षी क्रूरपणे नेण्यात येत होते. पशुप्रेमी शुब्रतो दास (३६) रा. कोलकाता हे याच गाडीने नागपूरला येत होते. पार्सल बोगीत कोलकातावरून लव्ह बर्ड, कबुतर, पांढरे उंदीर, ससा आणि इतर पक्षी असलेले नऊ पिंजरे ठेवण्यात आले होते. दास यांनी याबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या कार्यालयालाही माहिती दिली. गांधी यांच्या कार्यालयातने लागलीच या घटनेची दखल घेऊन नागपुरातील मानद पशुकल्याण अधिकारी अंजील वैद्यार यांना कळविले. वैद्यार यांनी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला पत्र देऊन मदतीची विनंती केली. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस येण्यापूर्वी सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, अनिल कुवर, प्रमोद घ्यारे, परमानंद वासनिक, नाजनीन पठाण, आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर पोहोचले. गाडी येताच पक्षी असलेले नऊ पिंजरे खाली उतरविण्यात आले. यावेळी पशुप्रेमी संघटनेच्या करिष्मा गिलानी उपस्थित होत्या. पिंजरे खाली उतरविल्यानंतर पिंजऱ्यातील जवळपास १०० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल रमेश आदमने, पशुवैद्यक पटेल रेल्वे स्थानकावर पोहोचले. कागदोपत्री कारवाईनंतर हे पक्षी वन विभागाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.