लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :
संबंधित कंपनीशी नुकताच रेल्वे प्रशासनाने करार केला आहे.रेल्वेस्थानकावर अनेकदा रेल्वेगाड्या उशिराने येणार असल्यामुळे प्रवाशांना गाड्यांची वाट पाहत बसावे लागते. वेटिंग रुमही फुल्ल असतात. प्रवाशांना गाड्यांची वाट पाहताना कंटाळा येतो. परंतु आता रेल्वेस्थानकावर जीम आणि योगाची सुरुवात केल्यामुळे प्रवाशांना वेळ घालविता येणार आहे. मध्य रेल्वेचा नागपूर विभाग व वोकॅनो लाईफस्टाईल यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाला मूर्तरूप देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रेल्वे आणि संबंधित कंपनीत करार झाला . या उपक्रमामुळे प्रवाशांना सुविधा मिळेलच पण रेल्वेला नॉन फेअर रेव्हेन्यू मिळणार आहे. अलीकडेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाची संकल्पना मांडली होती. त्याला अनुसरूनच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्टेशन परिसरात अशा प्रकारे फिटनेस सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कारवाई करणारे नागपूर हे पहिलेच स्थानक आहे. या उपक्रमात प्लॅटफार्म क्रमांक १ वर फिटनेस सेंटर सुरू होईल. यात जिममध्ये असणारी उपकरणे राहतील तसेच योगासनांसाठीचे साहित्यही उपलब्ध राहणार आहे. रेल्वेगाडीच्या कोचच्या आकाराचे एक सलून येथे तयार केले जाईल. फिटनेस सेंटरमधील सर्व सुविधा प्रवाशांना नि:शुल्क असतील. मात्र, सलूनमधील सुविधांसाठी शुल्क आकारले जाईल. डीआरएम सोमेशकुमार तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणजे प्रवासी भाड्याशिवायच्या महसुलासाठी आतापर्यंत ११ विविध उपक्रम सुरू केले आहेत. फिटनेस सेंटर या १२ व्या उपक्रमाची यात भर पडली आहे.