दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाडीची वाट पाहत प्लॅटफार्मवर उभे राहिले की कधी गाय येऊन शिंग मारेल याचा नेम नाही. १५ कुत्री तर हमखास प्लॅटफार्मवर फिरतात. सुविधांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रात्री पाण्याची साधी बाटलीही प्रवाशांना मिळण्याची सोय नाही. या सर्व असुविधा आहेत नागपूर रेल्वेस्थानकाच्या होम प्लॅटफार्मवरील. होय, या सर्व बाबींमुळे जीव मुठीत घेऊन गाडी येण्याची वाट प्रवाशांना पाहावी लागत असून, प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या होम प्लॅटफार्मवर समस्यांचा डोंगर निर्माण झाल्याची स्थिती आहे. प्लॅटफार्मवर मोकाट गार्इंचा कळपच फिरताना आढळतो. या गाई आपसात भांडत असताना जोरात प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफार्मवर अंदाधुंद पळत सुटतात. अशावेळी लक्ष नसल्यास प्रवाशांना या गार्इंपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होम प्लॅटफार्मवर नेहमीच १० ते १५ कुत्री फिरताना आढळतात. एखाद्या वेळी ही कुत्री प्रवाशांना चावण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या गंभीर बाबीकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
खाद्यपदार्थांचे स्टॉलही बंदरात्री होम प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थांचे स्टॉलही बंद राहतात. रेल्वेने या प्लॅटफार्मवर नॅरोगेज कोचमध्ये खाद्यपदार्थांचा स्टॉल सुरू केला. हा स्टॉल नेहमीच बंद राहतो. इतर खाद्यपदार्थ विक्रेतेही या प्लॅटफार्मवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांना पाण्याची बाटलीही मिळत नाही. त्यामुळे होम प्लॅटफार्मवर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
असामाजिक तत्त्वांचा उपद्रवहोम प्लॅटफार्म संत्रा मार्केटकडील परिसरात आहे. त्यामुळे या प्लॅटफार्मवर नेहमीच असामाजिक तत्त्वांचा उपद्रव आढळतो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान क्वचितच या प्लॅटफार्मवर आढळतात. शनिवारी रात्री या प्लॅटफार्मवर गार्इंचा कळप फिरताना आढळला तर कुत्र्यांची संख्याही १५ च्या आसपास होती. एकही सुरक्षा यंत्रणेतील व्यक्ती प्लॅटफार्मवर फिरताना आढळला नाही.