लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाच्या रेल्वे प्रवासी सेवा समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड. रमेश चंद्र रत्न यांनी आज नागपूरसह अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.रेल्वे प्रवासी समितीच्या अध्यक्षांनी रेल्वेस्थानकाच्या पाहणी दौऱ्यात प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. बुक स्टॉलवर अश्लील पुस्तक पाहून त्यांनी लवकर पुस्तकांच्या विक्रीचा ठेला हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर कमसम हॉटेलमध्ये त्यांनी पाकिटबंद नाश्त्यावर उत्पादनाची माहिती नसल्यामुळे आक्षेप घेतला. त्यांनी कमसम हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अहवाल तपासला. खराब झालेले संत्रे आढळल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होणार असून अधिकाऱ्यांना ही बाब गंभीरतेने घेण्याची सूचना केली. जनाहार रेस्टॉरंटमध्ये त्यांना बिस्कीटांची पाकिटे आढळताच त्यांचा राग अनावर झाला. ज्याप्रमाणे करार झाला त्यानुसार खाद्यपदार्थ विकण्याची सूचना त्यांनी केली. लोको रनिंग रुमकडे जाताना त्यांना रस्त्यात प्लास्टिकने गुंडाळलेल्या लाकडांचे पार्सल आढळले. यावर त्यांनी वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, रेल्वे सुरक्षा दलाचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता एस. एन. हाजरा, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.प्रवासी सुविधांचा घेतला आढावाअॅड. रत्न यांनी बुलंद आर्ट गॅलरी, फ्रूट स्टॉल, बॉटल रिसायकलिंग मशीन, वॉटर व्हेंडींग मशीन, लेडिज वेटिंग हॉल, एसी वेटिंग हॉल, रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणे, रेल्वे चाईल्ड लाईन सेंटर, बुकिंग कार्यालय, टु व्हीलर पार्किंग परिसराची पाहणी केली. त्यांनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. ई-तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी रेल्वे बोर्ड स्तरावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी अजनी आणि गोधनी रेल्वेस्थानकाची पाहणी केली.