लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु या भयावह स्थितीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अद्यापही पुणे, मुंबईवरून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांची तपासणी सुरू केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. परंतु रेल्वे स्थानकावर रुग्णांची तपासणी करण्याची यंत्रणाच नसल्यामुळे हे वॉर्ड काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने किमान मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या गाड्यातील कोरोनाची लक्षणे वाटत असलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाचे बहुतांश रुग्ण असलेल्या पुणे आणि मुंबईवरून नागपुरात रेल्वेगाड्या येत आहेत. यात मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरिबरथ एक्स्प्रेस या नागपुरात समाप्त होणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधील बहुतांश प्रवाशीही नागपुरातच उतरतात. त्यामुळे या सर्व गाड्यातील आजारी असलेल्या प्रवाशांची रेल्वे प्रशासनाने तपासणी करण्याची यंत्रणा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. परंतु अशी कोणतीच यंत्रणा अद्यापही रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून दिली नाही. यामुळे मुंबई, पुण्यातून नागपुरात येणारे प्रवासी कुठल्याही तपासणीविना थेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडत आहेत. यात एखादा कोरोनाचा संशयित रुग्ण असल्यास हा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे किमान मुंबई, पुण्यावरून येणाºया गाड्यातील प्रवाशांची तपासणी केल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबईवरून येणाºया प्रवाशांना तपासण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास प्रवासी स्वत:हून डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी करून घेतील. त्यासाठी पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात आणि पश्चिमेकडील भागात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
केवळ जनजागृती नाही पुरेशीकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ दिवसांपासून रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती करणे सुरू केले आहे. यात स्टीकर, बॅनरच्या माध्यमातून प्रवाशांना सूचना देण्यात येत आहेत. ध्वनिक्षेपकाहूनही प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु केवळ जनजागृती करून भागणार नसून रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावर संबंधित आजाराची लक्षणे वाटत असलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याची गरज आहे.
मुख्यालयाकडून आदेश आल्यावर करू तपासणीकोरोनाच्या रुग्णांसाठी रेल्वे रुग्णालयात दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. एखाद्या प्रवाशाने संपर्क साधल्यास त्याची तपासणी करून नमुने खासगी रुग्णालयात पाठविण्यात येतील. परंतु रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडून येणाºया रेल्वे गाड्यातील प्रवाशांची तपासणी करण्याचे कुठलेही आदेश नाहीत. रेल्वे मुख्यालयाकडून आदेश आल्यानंतर त्यांचीही तपासणी होईल.- एस.जी. राव, सहा. वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभाग