दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला. वर्ल्ड क्लास स्टेशनच्या धर्तीवर रेल्वेस्थानकावर विविध सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु मागील पाच वर्षात वर्ल्ड क्लास स्टेशनच्या दृष्टीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. रेल्वेस्थानकावर जाहीर करण्यात आल्याप्रमाणे एकही नवा प्रकल्प सुरु झालेला नसून वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाचे काम थंडबस्त्यात पडून आहे.२०१४ मध्ये नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये समावेश करण्यात आला. परंतु वर्ल्ड क्लासच्या धर्तीवर रेल्वेस्थानकावर काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. बंगळुर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास स्टेशन करण्यासाठी झपाट्याने काम सुरू आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील हबीबगंज रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. परंतु नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लासच्या दिशेने विकास कधी होईल, असा प्रश्न असून नागपूरचे नाव मागे पडले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.यात एस्केलेटर, बॅटरी कार, एसी वेटींग हॉल आदींचा समावेश आहे. परंतु वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाच्या यादीतील एकही मोठा प्रकल्प नागपूर रेल्वेस्थानकावर सुरू झालेला नाही.
रेल्वेनेच करावा वर्ल्ड क्लास स्टेशनचा विकासवर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकासाठी पीपीपी तत्त्वावर कंत्राटदारांना काम देण्यात येणार आहे. यात २ हजार कोटींची गुंतवणूक संबंधित कंत्राटदाराला करावी लागणार आहे. यात कुणी पुढे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे रेल्वेनेच वर्ल्ड क्लास स्टेशन विकसित करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.’-प्रवीण डबली,माजी झेडआरयुसीसी सदस्य
शॉपिंग कॉम्प्लेक्सची घोषणा हवेतचवर्ल्ड क्लासच्या रूपाने नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास करण्याची घोषणा झाल्यानंतर रेल्वेस्थानकावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार होते. यात प्रवाशांना रेल्वेगाडी येईपर्यंत शॉपिंग करण्यासाठी मॉलच्या धर्तीवर कॉम्प्लेक्स सुरू करण्याची योजना होती. प्रवाशांना यात सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध राहणार होत्या. याशिवाय प्रवाशांच्या करमणुकीसाठी एसी थिएटरची सुविधाही राहणार होती. परंतु शॉपिंग कॉम्प्लेक्सची घोषणाही हवेतच विरल्याचे दिसत आहे.
फूड कोर्ट सुरूकरण्याची मागणीनागपूर रेल्वेस्थानकावर देशाच्या चारही दिशांनी रेल्वेगाड्या येतात. अनेकदा प्रवाशांना रेल्वेगाडीची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर फूड कोर्ट तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती. यात प्रवाशांना सर्व प्रकारचे शुद्ध आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची योजना होती. परंतु फूड कोर्ट सुरू करण्यासाठी काहीच हालचाली करण्यात आल्याचे दिसत नाही.
प्रवाशांना हवी डायनिंग रुम, एसी रुमनागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. यात प्रवाशांची संख्याही ४० ते ४५ हजाराच्या जवळपास राहते. अशा वेळी प्रवाशांसाठी डायनिंग रुम आणि त्यांना थांबण्यासाठी एसी रुमची घोषणा करण्यात आली होती. यात प्रवाशांना एसी रुममध्ये वायफायसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. परंतु याबाबतीतही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले नाही.
मल्टी लेव्हल पार्किंगची गरजनागपूर रेल्वेस्थानकावर पार्किंगचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. सध्या पूर्वेकडील भागात आणि पश्चिमेकडील भागात पार्किंगची व्यवस्था आहे. परंतु प्रवाशांसाठी पार्किंगची जागा अतिशय अपुरी आहे. पैसे देऊनही प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याचे चित्र नागपूर रेल्वेस्थानकावर पाहावयास मिळते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मल्टी लेव्हल पार्किंग सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेचेही मागील पाच वर्षात काहीच होऊ शकलेले नाही.
एअरपोर्टच्या धर्तीवर प्रवेशनागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर एअरपोर्टच्या धर्तीवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात प्रवाशांना रेल्वेगाडी येण्याच्या अर्धा तास आधी रेल्वेस्थानकावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यांच्या सामानाची तपासणी करून नंतरच त्यांना आत सोडण्यात येणार होते. सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. परंतु याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.