नागपूर : दोन दिवस हलका ते मध्यम पावसानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात पावसाने धुमशान घातले आहे. २४ तास झालेल्या धुवांधार पावसाने जिल्ह्यात मान्सूनचा बॅकलॉग तर दूर केलाच पण सप्टेंबरची मासिक सरासरीही पार केली आहे. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये सरासरी १६८.४ मि.मी. पावसाची नोंद केली जाते. मात्र आजच्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात २५३.६ मि.मी. पाऊस झाला असून ताे सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक म्हणजे सामान्यपेक्षा १५० टक्के झाला आहे.
नागपूर शहराचा विचार केल्यास शनिवारी सकाळपर्यंत विमानतळ परिसरात ११६ मि.मी. तर कृषी महाविद्यालय परिसरात तब्बल १५९.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शहरात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ३०९.४ मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरी १६१.९ टक्के आहे. शहरात या काळात १९१.१ मि.मी. पाऊस होतो. शहरासह जिल्ह्यातही रात्री पावसाने धुवांधार बॅटिंग केली. कामठी, रामटेक, कुही, पारशिवनी, माैदा तालुक्यात पावसाच्या सरी धो-धो बरसल्या. सकाळपर्यंत जिल्ह्यात रामटेक तालुक्यात सर्वाधिक १५१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. महिनाभरात तालुक्यात ४९३.२ मि.मी. पाऊस झाला असून ताे सरासरीच्या २९८.५ टक्के आहे.
कामठी तालुक्यात शनिवारी सकाळपर्यंत १०४.४ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सप्टेंबर महिन्यात २९७.९ मि.मी. पाऊस झाला असून सरासरी १७९.५ टक्के आहे. कुही तालुक्यात सकाळपर्यंत ९६.७ मि.मी. पाऊस झाला. या महिन्यात आतापर्यंत २८२.१ मि.मी. पावसाची नोंद असून सरासरी १७२.३ टक्के आहे.
यासह पारशिवनीत ७५.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. येथे एकूण ३३२.८ मि.मी.पाऊस या महिन्यात झाला असून सरासरी २२५ टक्के आहे. याशिवाय शुक्रवारी मध्य रात्रीपासून मौदा, उमरेड, भिवापूर जोरदार तर काटोल, नरखेड, कळमेश्वर या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्व तालुक्यात सप्टेंबरची सरासरी १०० टक्क्याच्या पार गेली आहे. महिना संपायला अद्याप ७ दिवस बाकी असताना जिल्ह्यात मासिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.