नागपूर : आभाळाला गळती लागावी याप्रमाणे झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपुरात सर्वत्र दाणादाण उडाली. तर, पावसामुळे एसटी बस आणि रेल्वे सेवाही प्रभावित झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती.
शुक्रवारी सकाळपासून दिवसभर पावसाची रिपरिप होती. सायंकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जागोजागी महालक्ष्मी पूजन आणि महाप्रसादांचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. मात्र, मध्यरात्री पावसाने पुन्हा उसळी मारली. थोड्या थोड्या वेळाने होणारा विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा बेत ऐनवेळी रद्द केला. नागपुरात विविध भागातील रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहत असल्याने आणि मोरभवन बसस्थानक परिसराला तलावाचे रूप आल्याने वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी बाहेरून नागपुरात येणाऱ्या आणि येथून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.
याहीपेक्षा वाईट स्थिती रेल्वे प्रवाशांची होती. कुणाची मध्यरात्री तर कुणाची पहाटे आणि कुणाची सकाळी गाडी असल्याने संबंधित प्रवाशी रेल्वे स्थानकावर निघण्याच्या तयारीत होते. मात्र, विजांचा कडकडाट आणि पावसाचे राैद्र रुप बघून अनेकांनी आपला प्रवासाचा बेत ऐनवेळी रद्द केला. काहींनी मात्र तशाही स्थितीत रेल्वेस्थानक गाठले. दुसरीकडे बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांनी अशा वातावरणात घरी जाण्यापेक्षा स्थानकावरच राहणे पसंत केल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली होती.
स्टॉलवर उडाली झूंबड
उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंत सारखा पाऊस सुरू असल्याने बाहेरगावून येणाऱ्या गाडीतील प्रवाशांची स्थानकावर गर्दी वाढतच होती. त्यामुळे खाण्यापिण्याच्या स्टॉलवर एकच झूंबड उडाली होती.
पटरीवर पाणी, आउटरवर थांबल्या गाड्या
मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोनच्या पटरीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे धोक्याचे संकेत देऊन बाहेरून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या आउटरवरच थांबविण्यात आल्या. परिणामी रेल्वेचेही वेळापत्रक विस्कळीत झाले.