नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री नागपुरात बरसलेल्या मुसळधार पावसाने शहरभर हाहाकार माजविला. नदीनाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचा चांगलाच फटका बसला. त्यातच अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केले.
शनिवारी पहाटे पहाटे पावसाचा अनुभवलेला थरार आयुष्यात पहिल्यांदाच येथील रहिवाशांनी बघितला होता. पाण्याचा प्रवाह इतका होता की घरापुढे पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने वाहून जात होती. घराघरांत कंबरभर पाणी साचल्याने घरातील प्रत्येक वस्तू चिंब भिजल्या होत्या. सकाळी जेव्हा पावसाचा जोर कमी झाला, तेव्हा भिजलेल्या वस्तू आवरता सावरता अख्खा दिवस गेला. घराघरांमध्ये पावसामुळे गाळ साचला होता. अन्नधान्य भिजले होते. आलमाऱ्यातील कपचे भिजले होते. अनेकांच्या टीव्ही, सोफा, फ्रीज पाण्याखाली आल्या होत्या.
शनिवारची रात्र अनेकांनी कशीबशी काढली. रविवारी घर आवरता सावरता लोकं वैतागली होती. लोकमत प्रतिनिधींनी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या कार्पोरेशन कॉलनी, डागा लेआऊट, समता लेआऊट, वर्मा लेआऊट, गांधीनगर परिसराबरोबरच शहरातील झोपडपट्टी आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला असता, लोकांनी संताप व्यक्त करीत तक्रारी आणि गाऱ्हाणी मांडल्या.
- काहीच शिल्लक राहिले नाही
एनआयटी स्वीमिंग पुलासमोरील समता लेआऊटमध्ये पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. समता लेआऊटच्या कॉर्नरवर असलेल्या झेरॉक्स सेंटर, मोबाईल शॉपी व अन्य पाच दुकाने पाण्याखाली आली होती. झेरॉक्स चालक निशिकांत सोनटक्के यांचे घर आणि दुकान एकच आहे. पावसामुळे दुकानातील खराब झालेले साहित्याचा ढिगारा बाहेर काढला होता. लाखो रुपयांच्या मशीन पावसापासून वाचविता वाचविता अख्ख्या घरात आणि दुकानात पाणी साचले. त्यांना नुकसानीबाबत विचारले असता, पावसाने अगदी धूळधाण केली, आम्ही जिवंत आहोत, एवढेच. अजूनही घरातील पाणी निघाले नाही.
- आमचे आता आम्हालाच सावरायचे आहे
पावसामुळे दुकानातील खराब झालेले साहित्य संजू लिल्हारे बाहेर काढत होते. त्यांना पुराबाबत विचारले असता, म्हणाले की आम्ही पहिल्यांदा हा महापूर अनुभवला. माझे मोबाइलचे दुकान पाण्याखाली आले होते. दुकानातील सर्व साहित्य पाण्यात भिजले. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कार्पोरेशनकडून एक आशा वर्कर नाव व नुकसान किती झाले एवढे विचारून गेली. कुणी लोकप्रतिनिधी आमची व्यथा बघायला आला नाही. आज अख्ख्या वस्तीमध्ये चिखल पसरला आहे. लोकांच्या घरातील साहित्य पाण्यात भिजले आहे. आमचे आता आम्हालाच सावरायचे आहे. आमचा कुणीच वाली नाही.
- पावसाने अख्ख्या घराची धूळधाण केली
कार्पोरेशन कॉलनीतील प्रदीप लाखे यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला घरातील चुलीपर्यंत नेले. प्रत्येक खोलीत अवस्था दाखविली. त्यांच्या घरात घरभर पसारा पसरलेला होता. रविवारी अख्खा दिवस घरात साचलेला गाळ काढण्यात आला. पुस्तकं, कपडे, सोफा सर्व काही पाण्यात भिजले होते. पहाटे ५ वाजता वस्तीमध्ये आरडाओरड सुरू झाली तेव्हा त्यांना जाग आली, तर घरात दिवाणापर्यंत पाणी पोहोचले होते. पाण्याचा फ्लो इतका होता की दारही उघडत नव्हते. कम्पाऊंडचा गेट पाण्याखाली गेला होता. अंगावरच्या कपड्यासह त्यांनी आपले कुटुंब समोरच्या घरी हलविले. पावसाने त्यांच्या घरची अख्खी धूळधाण केली.
- दुकानातील अन्नधान्य झाले खराब
लॉण्ड्री आणि डेलिनिड्सचे दुकान चालविणारे रवी कनोजिया यांचे तर प्रचंड नुकसान झाले. दुकानातील एकही साहित्य शिल्लक राहिले नाही. तांदूळ, गहू, डाळी भरून ठेवलेल्या कोठ्यांमध्ये पाणी शिरले. लोकांनी लॉण्ड्रीसाठी दिलेले कपडे पूर्ण खराब झाले. दुकानातील फर्निचर, रेफ्रिजरेटर, शोकेस खराब झाले. ओल्या झालेल्या अन्नधान्याला दुर्गंधीही सुटली होती. डोळ्यांसमोर नुकसान होत असताना काहीच करू शकलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पावसामुळे दाराच्या फ्रेम खराब झाल्या. कम्पाऊंडची भिंत पडली. ग्राऊंड फ्लोअरला असलेल्या कार्यालयातील १० कॉम्प्युटर खराब झाले. दोन्ही कारमधले पाणी अजूनही निघाले नाही. किमान २० लाखांचे नुकसान झाले. याची भरपाई करणार तरी कोण?
- अनुराधा टिक्कस, पीडित रहिवासी