नागपूर : नागपूर शहरात चार तासात १०० मि.मी. पाऊस पडला. ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. नागनदीला पूर आल्याने नदी काठावरील वस्त्यात पाणी शिरले. नंदनवन झोपडपट्टीत नागनदीचे पाणी शिरल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली.
शुक्रवारी मध्यरात्रीपासुन सुरू झालेल्या पावसाने नागपुरला अक्षरश: झोडपून काढले. यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. नंदनवन भागातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझ्ड झाली आहे. परिसरातील वस्त्यातही पाणी शिरले आहे. स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. लोकांच्या समस्या जाणून घेतली. नंदनवन झोपडपट्टीतील घरात घाण पाणी साचल्याने लोकांनी रात्र जागून काढली. घरातील पाणी बदल्यांनी बाहेर काढण्यात अनेकांची रात्री गेली.
'या' जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!
२६ सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपुरात आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच, अनेक ठिकाणी विजांमुळे सेटटॉप बॉक्स, टीव्हीच्या आयसी उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, आज राज्यातील रायगड, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.