नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेयो, मेडिकलमध्ये पाणी शिरले. रुग्ण भिजल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचा वॉर्ड क्र.८, मेडीसीन विभागाचा वॉर्ड क्र. ३५, वॉर्ड क्र. १८, ईएनटी वॉर्डाचा व्हरांडा, पहिल्या मजल्यावरील पेईंग वॉर्डासमोरील व्हरांडा, ‘एक्स-रे’ विभागातील व्हरांडा, वॉर्ड क्र. २२ समोरील प्रतिक्षालयात पावसाचे पाणी शिरले. तर मेयोच्या क्षयरोग विभागाचा वॉर्ड क्र. १० हा खोलगट भागात असल्याने रात्रभर पाणी साचून होते. सकाळी विशेष उपाययोजना करीत पाणी बाहेर काढण्यात आले. विशेषत: येथील नर्सिंग कक्षात पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम झाला.
-मेडिकलचे आकस्मिक विभाग पाण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) आकस्किम विभागाचे प्रवेशद्वार खोलगट भागात आहे. यामुळे परिसरातील पावसाचे पाणी या भागात साचून राहते. शनिवारी चार ते पाच फुट पाणी साचले होते. रुग्णांना या पाण्यातून वाट काढावी लागली. काहींनी रुग्णांना उचलून तर कोणी रुग्णाला पाटीवर धरून विभागाच्या आत नेले. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने डॉक्टरांसह परीचारिकांना रुग्णसेवा देण्यास अडचणीचे गेले.
-प्रवेशद्वार बंदचा बसतोय फटका
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मेडिकलने संरक्षक भिंतीसह मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम हाती घेतले. तिथे नवे बांधकाम होत असल्याने हा मार्ग बंद करून जुने बंद असलेले प्रवेशद्वार सुरू केले. परंतु या मार्गावरील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यातच अतिक्रमण वाढल्याने रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहचण्यात उशीर होत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून असल्याने रुग्णांना विशेषत: लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांना चालणे कठीण झाले आहे.