नागपूर : नागपुरात ढगफुटीमुळे नुकसान झाले. हे सरकारचे अपयश आहे. केंद्र आणि राज्य सरकार नागपुरातून चालते, असा आव आणतात. पण त्या शहराकडे दुर्लक्ष झाले आहे. भाजपने १७ वर्षे नागपूर महापालिकेत सत्ता भोगली. नागपूरचा विकास नाही भकास आहे, विनाश आहे, अशी टीका करीत नुकसान झाले त्यांचे पंचनामे करुन नागपूरकरांना भरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी नागपुरात केली.
पटोले म्हणाले, सिमेंट रस्त्यांमुळे नागपूरातील तापमान वाढले. रोगराई वाढली. पाण्याचा निचरा होणे बंद झाले. विविध बांधकामांसाठी नागपूरची हिरवळ तोडण्यात आली. नाग नदीच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. अंबाझरी परिसरात झालेल्या बांधकामामुळे हे झाले आहे. छोट्या व्यापाऱ्यांनी दुकानात माल भरला होता, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यांना नागपूरकर कधीही माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. नागनदीत जहाजं येणार होती. पण रस्त्यांवर बोटी चालताना पहाव्या लागल्या. नागपूरकरांचा भाजपवरील विश्वास कमी होत आहे. नागपूर ग्रामीण मध्ये भाजपचा सुपडा साफ झाला आहे, असेही ते म्हणाले.
विवेकानंद स्मारकाच्या बांधकामाचे ऑडिट व्हावे
अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॅाईंटवर विवेकानंद स्मारक बांधले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडून पूर वाढला. याचे ॲाडीट होणे आवश्यक आहे. अंबाझरी तलाव कधीही फुटू शकतो. त्यामुळे याचे सोशल आणि स्ट्रक्चरल ॲाडीट व्हावे, अशी मागणीही पटोले यांनी केली.
निलम गोऱ्हेंवर अपात्रतेची कारवाई होणार
शेड्यूल १० प्रमाणे अपात्रतेबाबत सुनावणी संपवायला हवी होती. पण भाजपच्या दबाव आणि ईडी, सीबीआयमुळे संविधानाची पायमल्ली होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे कान टोचले होते. मात्र, भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे. सुनील प्रभू हेच प्रतोद आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे. त्यांचाच व्हीप खरा असून यामुळे १६ जण अपात्र होतील. निलम गोऱ्हे यांच्यासमोर कायदेशीर पेच निर्माण होणार. आधी त्या आमदार आहेत. नंतर उपसभापती. त्यांनी पक्षादेश तोडला त्यामुळे कारवाई होईल, असा दावाही पटोले यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चौथ्या स्तभांला म्हणतात की, यांना चहा आणि ढाब्यावर घेऊन जा. यांना देश यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही पटोले म्हणाले.