नरेश डोंगरे
नागपूर : आकाशात विजांचे तांडव सुरू होते. वीज चवताळल्यासारखी वारंवार कडाडत होती. खाली छातीएवढे पाणी होते ते वरवर चढतच होते. आणि वरच्या रूममध्ये एक महिला तिच्या मुलासह मदतीसाठी याचना करीत होती. समोर अंधारघुप्प होता. अग्निशमन दलासह बचाव पथकांचे संपर्क क्रमांक सलग व्यस्त असल्याने मदतीची आसच दिसत नव्हती. परिणामी तीन तासांपासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेली महिला आणि मुलगा जीवाच्या भितीने ईश्वराची करुणा भाकत होती. अशात शेरदिल खाकी तेथे पोहचली. यशोधरानगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून तीव्र प्रवाहातील पाण्यात स्वत:ला झोकून दिले अन् काळाशी संघर्ष करीत मायलेकाचे प्राण वाचविले. प्रचंड थरारक असा हा प्रसंग शनिवारी पहाटे ५ वाजताचा आहे.
या घटनेचा व्हिडीओ पुढे आल्यानंतर पोलीस दलासोबतच सामान्य नागरिकांकडूनही रियल हिरो म्हणून काैतुकाचा वर्षाव होत असलेले ठाणेदार भेदोडकर नाईट राउंड संपवून घराकडे निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात कंट्रोलने वायरलेसवर कॉल दिला. एका ईमारतीच्या आत एक महिला आणि मुलगा अडकला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर अनर्थ होऊ शकतो, असा हा कॉल होता. तो ऐकताच ठाणेदार भेदोडकरांनी आपल्या सहकाऱ्यांना पोलीस वाहन धंतोलीतील जानकी चित्रपट गृहाकडे घेण्याची सूचना केली.
काही वेळेतच ते तेथे पोहचले. बंद पडलेल्या चित्रपट गृहाच्या समोरच्या खोलगट भागातून वाहणारा पाण्याचा प्रवाह उजाडण्यापूर्वीच्या अंधाराला अधिकच गडद करीत होता. मदत करणाऱ्या यंत्रणेतील कोणत्याही बचाव पथकाकडून काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्याचे कंट्रोलमधून वायरलेसवर सुरू असलेल्या एपीआय मंगला वाकडेंच्या संभाषणावरून लक्षात आल्याने खाकीतील भेदोडकर यांच्यातील वाघाच्या काळजाचा माणूस जागा झाला. त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचे ठरवले. वाहनातील नायलोनचा दोर कंबरेच्या बेल्टला बांधला अन् छातीभर पाण्याच्या तीव्र प्रवाहातून पलिकडच्या ईमारतीकडे पोहत निघाले. चित्रपटगृहाच्या एक्झिट गेटवरून कसेबसे वरच्या रुमकडे चढले.
सर्वत्र अंधार होता. मात्र, जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडणाऱ्या मायलेकाचे आवाज तेवढे ऐकू येत होते. भेदोडकर यांनी त्यांना आपण 'पोलीस' असून मदतीसाठी आल्याचे सांगत मोबाईलचा टॉर्च सुरू करून समोर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रचंड घाबरलेले मायलेक समोर आले. भेदोडकरांनी तशाच अवस्थेत त्यांचे समुपदेशन करीत त्यांना धोका समजावून सांगितला. एकसाथ तिघे बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास वाहून जाण्याचा धोका आहे, हे लक्षात आणून देत एकेकाने दोघांना सुरक्षित ठिकाणी नेतो, असेही सांगितले. त्यानंतर खाली उभे असलेल्या पोलिसांना वाहनाच्या लाईटचा प्रकाश पाण्याच्या प्रवाहावर रोखा, असे सांगून भेदोडकर यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून आधी महिलेला आणि नंतर तिच्या १६ वर्षीय मुलाला छातीएवढ्या पाण्यातून कमी असलेल्या पाण्याच्या ठिकाणी नेले. एरव्ही एनएमसीचे बचाव पथक पलिकडच्या काठावर पोहचले होते. त्यांनी कसाबसा दोर दुसऱ्या टोकावर फेकला. त्यानंतर वेगवान प्रवाहातून या मायलेकांना सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
चित्रपटगृहाची मालकीण, मात्र...
भेदोडकरांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावल्यामुळे जीवदान मिळालेली महिला पाण्यातून बाहेर येताना दोनदा घसरली होती. मात्र, तिला खाकीने सावरले. या महिलेचे नाव सुनीता तिवारी असून त्या कधी काळी नावारूपाला असलेल्या आणि सध्या बंद असलेल्या जानकी चित्रपटगृहाच्या मालकीण आहेत. हे दोघेच मायलेक सध्या तेथील एका रूममध्ये राहायला होते. आपला जीव वाचला, आपण सुरक्षितपणे बाहेर आलो यावर त्यांचा बराच वेळ विश्वास बसत नव्हता. जेव्हा त्या भानावर आल्या तेव्हा सारख्या पाया पडत आभार व्यक्त करीत होत्या.