नागपूर : गुरुवारी नागपुरात दिवसभर पावसाने उसंत घेतली. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत चांगल्याच सरी बरसल्या. सकाळी ५३.२ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. विदर्भात सर्वत्र तिसऱ्या दिवशीही पावसाने जाेरदार हजेरी लावली. चंद्रपूर, गडचिराेली व यवतमाळमध्ये धुवाधार मुसंडी मारली. या तिन्ही जिल्ह्यांत सकाळपर्यंत ६० मि.मी.च्या वर पावसाची नाेंद करण्यात आली.
हवामान विभागाने २०, २१ ऑगस्टला नागपुरात यलाे अलर्ट जारी केला हाेता. मात्र गुरुवारी पावसाचा जाेर काहीसा ओसरलेला दिसला. थाेड्या वेळाचे तुषार वगळता दिवसभरात नाेंद झाली नाही. त्यामुळे रेनकाेट न वापरता नागरिकांनी रहदारीचा आनंद घेतला. पावसाळी वातावरण मात्र कायम हाेते. विदर्भाच्या इतर जिल्ह्यांत मात्र तिसरा दिवसही ओलाच राहिला. बहुतेक जिल्ह्यांत चांगल्या पावसाची नाेंद झाली. चंद्रपूरमध्ये सकाळपर्यंत सर्वाधिक ६९.२ मि.मी., तर त्याखालाेखाल गडचिराेलीमध्ये ६७.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळमध्ये ५८ मि.मी., तर बुलडाण्यात ४५ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. याशिवाय अकाेला ३७ मि.मी., अमरावती २९.२ मि.मी., वर्धा ३२ मि.मी., तर वाशिममध्ये २४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला.
ढगाळ वातावरणामुळे नागपूरच्या तापमानात १.८ अंशाची घट झाली व ते २८.२ अंश नाेंदविले गेले. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३०.२ अंश तापमान हाेते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१ ऑगस्टपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमीअधिक पाऊस हाेणार आहे, तर त्यानंतर काही भागात पावसाची हजेरी राहील.