ठळक मुद्देश्री पोद्दारेश्वर मंदिरातून थाटात निघाली शोभायात्रा, ५२ वर्षांची नेत्रदीपक परंपरामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची उपस्थिती५०१ शंखांच्या निनादाने दुमदुमला आसमंत
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या या सत्संगाचे प्रमुख केंद्र होते श्री पोद्दारेश्वर राम मंदिर. या मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे यंदाचे ५२ वे वर्ष होते. सजलेल्या श्रीरामाच्या रथाची आरती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार यांनी सजवलेल्या शक्तिरथावर प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण तसेच वीर हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बंग, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, अॅड. संजय बालपांडे, सरला नायक, विद्या कन्हेरे, जयप्रकाश गुप्ता, अजय तारवानी, थावरदास तारवानी, ्शोक गोयल, हर्ष अग्रवाल, सुरेश जैस्वाल, पुष्करलाल अग्रवाल, विजय अग्रवाल, राजेश रोकडे आदी उपस्थित होते. रथावर विराजमान श्रीरामाच्या पुजनानंतर मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, महापौर यांनी हा रथ काही अंतरापर्यंत ओढला आणि या देखण्या शोभायात्रेला थाटात सुरुवात झाली.अमन शांती समितीने केले स्वागतमुस्लीम बांधवांनी अमन शांती समितीतर्फे पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. सोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा हा संदेश संपूर्ण देशभर जावा म्हणून शांतिदूतचे प्रतीक असलेले कबुतरही सोडण्यात आले. देशात प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेतून हा सामाजिक ऐक्याचा संदेश संपूर्ण भारतात पोहचावा, अशी अपेक्षा या मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली. कमिटीचे अध्यक्ष मुश्ताक बाबा खान, आसिफ कर्नल, शेख आमिर आॅटोवाले, हनिफ पुरीवाले, जमिल खाँ, अनुभाई पुरीवाला, बाबा कर्नल यांच्या नेतृत्वात हा स्वागत सोहळा झाला. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचा रथ येताच पुष्पवृष्टी केली तसेच शोभायात्रेत सहभागी रामभक्तांना रामजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
समतायुक्त समाजाच्या निर्मितीचे कार्य : मुख्यमंत्रीनागपुरात दरवर्षी रामनवमीला शोभायात्रा निघते. ही देशातील एक मोठी शोभायात्रा ठरली आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक यात सहभागी होतात. प्रभू रामाने ज्याप्रमाणे समाजाची निर्मिती त्या काळात केली त्याचीच आठवण ही शोभायात्रा करून देत असते. समतायुक्त समाजाच्या निर्मितीकरिता या शोभयात्रेच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शोभयात्रेच्या आयोजनाचा गौरव केला.
नागपूरची शोभायात्रा देशाचे आकर्षण : गडकरीआमच्या देशाचा जाज्वल्य इतिहास आणि संस्कृतीची परंपरा घेऊन आम्ही रामराज्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत. प्रभू रामाला आम्ही आदर्श राजा मानतो. त्यांचा जन्मदिवस नागपुरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी शहरात निघणारी शोभायात्रा तर आता पूर्ण देशाच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. प्रभू श्रीरामाने दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प रामनवमीच्या या पावन पर्वावर प्रत्येकाने करावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी शोभायात्रेच्या शुभारंभाप्रसंगी केले.