लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज मीटर हा महावितरणसाठी जिव्हाळ्याचा विषय असून, या आधारेच महावितरणची एकूणच आर्थिक वाटचाल अवलंबून असते. नादुरुस्त वीज मीटरमुळे ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो; सोबतच महावितरणच्या महसुलाचेसुद्धा नुकसान होत असते. हे हेरून महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात नादुरुस्त वीज मीटर बदलण्यास प्राधान्य देत वर्ष २०१८-१९ मध्ये आतापर्यंत तब्बल ३५ हजार १६१ नादुरुस्त मीटर्स बदलण्यात आले आहेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंदही करण्यात आली आहे.१ एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत नागपूर परिमंडळात येणाऱ्या वर्धा जिल्ह्यात २,२११ तर नागपूर शहर आणि ग्रामीण मंडळ कार्यालयांतर्गत ४,४०४ वीज मीटर्स बदलण्यात आली आहेत. महावितरणची वितरण फ्रेन्चाईजी असलेल्या मे. एसएनडीएल यांनीही या काळात ७२८ नादुरुस्त वीज मीटर्स बदलली आहेत. याशिवाय अकोला मंडळात २,९९२, बुलडाणा मंडळ ३,१७८, वाशीम मंडळ १२८८, अमरावती मंडळ ४,९५८, यवतमाळ मंडळ ३,१०३, चंद्रपूर मंडळ ३,७४६, गडचिरोली मंडळात ३,५७६, भंडारा २,१७४ तर गोंदिया मंडळात २,८०३ नादुरुस्त वीज मीटर बदलण्यात आले. असे संपूर्ण नागपूर परिक्षेत्रात एकूण ३५ हजार १६१ नादुरुस्त वीज मीटर्स बदलण्यात आले आहेत. बिलिंगसाठीमहावितरणकडून विशेषत्वाने प्रयत्न सुरू असून नवीन वीज जोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीज मीटर ग्राहकाकडे राहणार नाही, याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असून ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीज मीटर त्वरित बदलण्याची काळजी घेण्यात येत आहे.उन्हाळ्याच्या येत्या तीन महिन्यांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीज वापर वाढणार असल्याने या वाढलेल्या वीज वापराचे अचूक बिलिंग होऊन त्याच्या वसुलीला प्राधान्य देऱ्यासाठी नादुरुस्त वीजमीटर बदलण्याची मोहीम अधिक आक्रमकतेने राबविण्याचा निर्णय महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी घेतला आहे. सध्या राज्यभर पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध असून ग्राहकांना गरजेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगितले. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होते. त्यामुळे या काळात ग्राहकांच्या वीज वापराचे अचूक रिडींग येण्यासाठी व त्यानुसार बिलिंग होऊन त्याची वसुली वाढवण्यासाठी आताच नादुरुस्त वीज मीटर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व क्षेत्रीय अभियंत्यांना दिल्या आहेत.