लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालक, किशोरी मुली आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी व्हावे, शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी म्हणून राज्यात संपूर्ण सप्टेंबर महिना पोषण अभियान माह म्हणून राबविण्यात आला. या महिन्याभरात सूक्ष्म पोषण व आरोग्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले. यात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. महिला व बाल कल्याण विभागाने पोषण अभियानात केलेल्या कामांचे रेटिंग काढले असता, नागपूर १३ व्या स्थानावर राहिले तर अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावला.एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत संपूर्ण सप्टेंबर महिन्याभर पोषण महिना घोषित करून या संपूर्ण महिन्यात पोषण आहार विषयी जनजागृती करून लोकचळवळीचे स्वरुप देण्याकरीता २०१८ पासून अभियान राबविण्यात येत आहे. गेल्यावषी नागपूर जिल्हा २० व्या क्रमांकावर होता. या अभियानात ० ते ६ वयोगटातील बालकांमधील खुजे, बुटकेपणाचे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुली, महिला यांच्यामधील रक्ताक्षय कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणारे बालकांचे प्रमाण कमी करणे हे चार उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानात बालके, किशोरी, माता, स्तनदा माता, गरोधर महिला तसेच ग्रामस्थ यांच्याकरीता ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि आरोग्य विभागाद्वारे जागर करण्यात आला. ज्यात पोषण विषयक चित्रफित दाखविण्यात आली. प्रभातफेरी, बालकांचे स्क्रिनिंग, आरोग्य केंद्रावर कार्यशाळा, औषधे वाटप, स्तनपान व शिशुपोषण बाबत गृहभेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. किशोरींना मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी, कुपोषण दिवस साजरा करणे, ग्राम आरोग्य व स्वच्छता पोषण दिवस आदीच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात आली.या संपूर्ण अभियाना जिल्हा परिषदेचे कृषी, समाजकल्याण, पंचायत, शिक्षण, स्वच्छता व पाणी पुरवठा या विभागांचाही समावेश होता. पोषण अभियानाच्या उपक्रमात नोडल एजन्सी म्हणून महिला व बाल कल्याण विभागाने काम केले.
पोषण अभियानात राज्यात नागपूर १३ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 8:08 PM
महिला व बाल कल्याण विभागाने पोषण अभियानात केलेल्या कामांचे रेटिंग काढले असता, नागपूर १३ व्या स्थानावर राहिले तर अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावला.
ठळक मुद्देअमरावतीने पटकावला प्रथम क्रमांक