नागपूर : मध्यभारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपलब्ध पायाभूत सोयी, रुग्णांची संख्या व दिली जाणारी सुपर स्पेशालिटी सेवा याची दखल घेण्यात आली आहे. यामुळे हे रुग्णालय देशातील सर्वाेत्कृष्ट ३० मध्ये आले आहे. लवकरच सुरू होणारे ट्रामा केअर सेंटर, ९० खाटांचे अतिदक्षता विभागासह, रुग्णांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याने श्रेणीमध्ये नक्कीच वाढ होईल, असा विश्वासही अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिला. डॉ. निसवाडे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना, ‘हासा’ने (एचएएसए) फेब्रुवारी २०१५ मध्ये सर्वेक्षण केले होते. यात रुग्णालयामधील सोयीसुविधा, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या, त्यांची तपासणी, भविष्यातील योजना आदी मापदंड ठेवण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील सुमारे ४०० मेडिकल महाविद्यालयांचा यात समावेश करून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांच्या यादीत मेडिकल ३० व्या क्रमांकावर आले आहे. सर्वेक्षणात मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा यात समावेश करण्यात आलेला नाही, नाहीतर मेडिकल पहिल्या दहामध्ये असण्याची शक्यता होती. कारण, सुपर स्पेशालिटीमधील दोन विभागात ‘डीएम’च्या जागा आहेत. ओपीडी देशातील इतर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तुलनेत अधिक आहे. पुढील महिन्यात किडनी ट्रान्सप्लान्ट युनिट सुरू करण्याच्या दिशेने कार्य सुरू आहे. या शिवाय मेडिकलमध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होत आहेत. मेडिकलमध्ये राज्यातूनच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. मागील काही वर्षांपासून उत्तर प्रदेश येथूनही रुग्ण येत आहेत. (प्रतिनिधी)तीन नवीन अतिदक्षता विभागमेडिकलमध्ये बालरोग विभाग, शल्यचिकित्सा विभाग व औषध वैद्यक शास्त्रविभाग अशा तीन विभागांचा ९० खाटांचा नवीन अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येत आहे. यासाठी प्रस्तावित जागेवरील वृक्षतोडीसाठी महानगरपालिकेला ४ लाख देण्यात आले आहेत. या विभागामुळे उत्कृष्ट उपचार आणि सेवा मिळेल, असेही डॉ. निसवाडे म्हणाले.जेजे रुग्णालय ‘टॉप’ पाचमध्ये!‘हासा’ने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईच्या जेजे रुग्णालयाचा टॉप पाचमध्ये समावेश आहे. दंत कॉलेजमध्ये मुंबईच्या दंत रुग्णालयाचा पहिल्या तीन मध्ये समावेश आहे. औरंगाबाद दंत कॉलेज पहिल्या पाचमध्ये आहे. पुण्याचे बीजे कॉलेज टॉप २० मध्ये आहे. देशभरातील कॉलेजमध्ये मेडिकलचा समावेश झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता महेशकुमार अग्रवाल यांच्यातर्फे अधिष्ठाता डॉ. निसवाडे, उपअधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, डॉ. राज गजभिये आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नागपूरचे मेडिकल देशात ३० व्या क्रमांकावर
By admin | Published: June 19, 2015 2:41 AM