नागपूर : देशभरातील स्वच्छता सर्वेक्षणात राज्याच्या उपराजधानीला या वर्षी पुन्हा एकदा मान खाली घालावी लागली आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत मागील वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग तब्बल ५ अंकाने घसरली असून, आपले शहर १८ वरून २३ क्रमांकावर पाेहोचले आहे. शहरात पसरणाऱ्या घनकचऱ्याचे याेग्य व्यवस्थापन करू न शकल्यानेच ही नामुष्की ओढावल्याचे जानकारांचे मत आहे.
१० लाखांच्या वर लाेकसंख्या असलेल्या देशातील प्रमुख शहरांना दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाची रँकिंग देण्यात येते. या वर्षी ६,००० मार्कांची ही परीक्षाच हाेती. सर्टिफिकेशन व घनकचरामुक्त शहराच्या रँकिंगमध्ये नागपूर पिछाडीवर गेले. सर्टिफिकेशनच्या १,८०० गुणांपैकी नागपूरला केवळ ७०० गुण मिळाले. दुसरे म्हणजे घनकचरा मुक्त शहराच्या १,१०० गुणांपैकी नागपूरला शून्य क्रमांक मिळाला. इतर गटांमध्ये मात्र शहराने प्रगती केल्याचे म्हणावे लागेल. सेवा स्तराच्या प्रगतीत २,४०० पैकी १८६५.९१ गुण तर सिटिझन फिटबॅकमध्ये १,८०० पैकी १३५५.९१ गुणांची भर पडली. उघड्यावर शाैचमुक्त हाेण्याच्या बाबतीतही सुधारणा दिसून आली असून, ७०० पैकी ५०० गुण मिळाले. यावेळी स्टार रेटिंगमध्येही शहर पिछाडले आहे.
विशेष म्हणजे, शहरात कचरा संकलनासाठी महापालिकेने दाेन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मात्र, त्याचे परिणाम दिसून येत नाही. घनकचरामुक्त शहराच्या श्रेणीत शून्य गुण मिळणे, त्याचेच द्याेतक आहे. मनपाच्या सभागृहात अनेक सदस्यांनी उघड्यावर कचरा राहत असल्याचे वारंवार निदर्शनात आणून दिले. त्यानंतर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या समाेर अनेकदा सुनावणीही झाली. मात्र, त्यातून काही लाभ झाला नाही, असेच म्हणावे लागेल. यावरून मनपामध्ये सत्तासीन भाजपची पकड स्वच्छतेच्या बाबतीतच कमजाेर पडत आहे, असे बाेलले जात आहे.
१० टक्के गुण घटले
२०२० व २०२१ या दाेन्ही वर्षांत विविध श्रेणी मिळून ६,००० गुण निर्धारित करण्यात आले हाेते. २०२० मध्ये ४,३४५ गुणांसह ७२.०४ टक्के गुण मिळाले हाेते. या वर्षी ३७२१.८२ गुण म्हणजे ६२.०३ टक्के गुण मिळाले. यावरून नागपूरचे गुणांकन १० टक्क्यांनी घटले. मागील वर्षी ४७ शहरात १८वा क्रमांक मिळाला हाेता.
ताेपर्यंत पहिल्या १० मध्ये स्थान नाही
ग्रीन व्हिजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी म्हणाले, गेल्या वर्षीही आपण सर्टिफिकेशन व घनकचरामुक्त शहराच्या श्रेणीत पिछाडीवर हाेताे व या वर्षीही त्यात सुधारणा झाली नाही. घनकचऱ्यावर ट्रीटमेंट हाेत नाही, ताेपर्यंत टाॅप टेन शहरात येणे कठीण आहे. कारण ४० गुण घनकचऱ्याचे कलेक्शन, विलगीकरण, नियाेजन या व्यवस्थापनावर निर्धारित आहेत. स्वच्छता सर्वेक्षणाचे काम अप्पर आयुक्त राम जाेशी यांच्याकडून काढणे, हेही माघारण्याचे प्रमुख कारण ठरले. दुसरीकडे उपायुक्त डाॅ.प्रदीप दासरवार गेल्यानंतर राजेश भगत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली व तेही काही महिन्यात निवृत्त झाले. स्थानिक स्तराच्या अधिकाऱ्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देऊन राम जाेशी यांच्या मार्गदर्शनात काम व्हायला हवे, असे मत चटर्जी यांनी व्यक्त केले.