लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्यासाठी दोन भावांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ज्यांची मालमत्ता आहे त्यांनाच येथून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या बनवाबनवीचा पर्दाफाश झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या वृद्धाच्या दोन सख्ख्या भावांवर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. इक्बाल अहमद मस्ताक अहमद (रा. अनंतनगर) आणि इराक अहमद मुस्ताक अहमद (रा. योगेंद्रनगर) अशी आरोपींची नावे आहेत.या प्रकरणातील फिर्यादी मुख्तार अहमद मुस्ताक अहमद (रा. पटेलनगर) यांचे उपरोक्त आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर चौकात मुख्तार अहमद मुस्ताक अहमद (६३) यांच्या मालकीची न्यू कार्तिक फर्म (कल्पना टॉकीज) असून आरोपी त्यात भागीदार होते. काही वर्षांनी ते भागीदारीतून मुक्त झाले. त्यानंतर मुख्तार अहमद यांची प्रकृती बिघडल्याची संधी साधून आरोपींनी त्यांचे बनावट हस्ताक्षर करून पॅराडाईज सिनेमा नावाची दुसरी फर्म तयार केली. त्यात भागीदार असलेल्या जोगेब अयाज यांना या बनवाबनवीची कल्पना न देता त्यांनाही आरोपींनी गुन्हेगारी कृत्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. ही बनावट कागदपत्रे शासकीय कार्यालयात सादर करून आरोपींनी फिर्यादीसोबत शासनाचीही फसवणूक केली. ते लक्षात आल्यानंतर मुख्तार अहमद यांनी या संबंधाने आरोपींना विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली शिवाय त्यांच्या मालकीच्या फर्ममध्ये त्यांनाच येण्यास प्रतिबंध केला. १ मे २०१० पासून सुरू असलेल्या आरोपींच्या फसवणुकीविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या या अन्यायाविरुद्ध मुख्तार अहमद यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. प्रदीर्घ चौकशीनंतर सोमवारी या प्रकरणी ठाणेदार भरत ठाकरे यांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात सख्ख्या भावांनी केली दगाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:27 AM
आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कोट्यवधींची मालमत्ता हडपण्यासाठी दोन भावांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ज्यांची मालमत्ता आहे त्यांनाच येथून बेदखल करण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देकोट्यवधींची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न बनावट फर्मची कागदपत्रे बनविलीदोघांविरुद्ध गुन्हा दाखल