लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून नागपूर विभागाला कोविशिल्डचे २,७६,०००, तर कोव्हॅक्सिनचे १,१७,७६० डोस असे एकूण ३,९३,७६० डोस उपलब्ध झाले. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सहा जिल्ह्यांच्या गरजेनुसार डोसचे वितरण केले. यात नागपूर जिल्ह्याच्या वाटेला कोविशिल्डचे १,५३,२००, तर कोव्हॅक्सिनचे २०,४०० डोस आले. सध्या जिल्ह्यात कोविशिल्डचे १,०३,०००, तर कोव्हॅक्सिनचे ६७,३६० डोस शिल्लक आहेत.
नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ९ ते १० हजार डोस लावले जात आहेत. लसीचा तुटवडा पडू नये म्हणून मंगळवारी वर्धा जिल्ह्यातून ‘कोव्हॅक्सिन’चे ७ हजार, तर नागपूर ग्रामीणकडून ‘कोविशिल्ड’चे ५ हजार डोस मागविण्यात आले होते. सोबतच राज्याच्या आरोग्य विभागाकडून अधिक लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज दोन्ही लसीचे एकूण ३,९३,७६० डोस उपलब्ध झाले. आतापर्यंत या लसीचे वितरण पुणे येथून केले जात होते; परंतु काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असताना लसीचा पुरवठा अधिक होत होता. यामुळे आता उपसंचालक आरोग्य विभागाने पुढाकार घेत लसीचे वितरण केले. त्यानुसार भंडारा जिल्ह्याला कोविशिल्डचे १९,८००, तर कोव्हॅक्सिनचे ३०,०००डोस मिळाले. सध्या या जिल्ह्यात कोवीशिल्डचे २,५६,२००, तर कोव्हॅक्सिनचे ८७,७६० डोस शिल्लक आहेत. गोंदिया जिल्ह्याला कोविशिल्डचे १८,०००, तर कोव्हॅक्सिनचे २५,०००डोस मिळाले. या जिल्ह्यात कोविशिल्डचे ८५,०००, तर कोव्हॅक्सिनचे ४२,३६० डोस शिल्लक आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला कोविशिल्डचे ४५,०००, तर कोव्हॅक्सिनचे ४,८०० डोस मिळाले. या जिल्ह्यात कोविशिल्डचे ४०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ३७,५६० डोस शिल्लक आहेत. वर्धा जिल्ह्याला कोविशिल्डचे ३०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ५,०००डोस मिळाले. जिल्ह्यात कोविशिल्डचे १०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ३२,५६० डोस शिल्लक आहेत. गडचिरोली जिल्ह्याला कोविशिल्डचे १०,०००, तर कोव्हॅक्सिनचे ५,००० डोस मिळाले. सध्या कोविशिल्डचे शून्य, तर कोव्हॅक्सिनचे २७,५६० डोस शिल्लक आहेत.