नागपूर : जुलै महिन्याच्या सुरुवातीच्याच दहा दिवसांत जून महिन्याचा बॅकलॉग भरून काढण्यासोबतच जुलैत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत ६५.५० टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित दिवसांतही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी नागपुरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी ५.३० पर्यंत ४० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
नागपुरात १६ जूनला मान्सूनने हजेरी लावली. ३० जूनपर्यंत ११९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. वास्तविक, जून महिन्यात सरासरी १६९ पाऊस पडतो. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत २९ मि.मी. पाऊस कमी झाला. मात्र जुलै महिन्यात मेघराज प्रसन्न झाले असून, सुरुवातीच्या दहा दिवसांतच २५४.८ मि.मी. पाऊस झाला. जूनचा बॅकलॉग पूर्ण करून जुलैच्या एकूण पावसाच्या तुलनेत ६५.५० टक्के अर्थात २०५.५ मि.मी. पाऊस झाला आहे. वास्तविक, जुलै महिन्यात सरासरी ३१३.७ मि.मी. पाऊस होतो. उर्वरित दिवसांत १०८.२ मि.मी. पावसाची गरज आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत जोराचा पाऊस होणार असल्याचा अलर्ट जारी केला आहे.
नागपुरात ऑरेंज अलर्ट
नागपुरात १२ जुलैला ऑरेंज अलर्ट व १३ जुलैला यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. ऑरेंज अलर्टदरम्यान ६० मि.मी.हून अधिक पाऊस पडण्याची शक्यता असते. नागपुरात गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे.
दुपारी धुवाधार पाऊस; ४० मि.मी.ची नोंद
नागपुरात सोमवारी दुपारी २ नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ४ पर्यंत अधूनमधून पावसाच्या जोरदार व मध्यम सरी आल्या. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०पर्यंत शहरात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. आर्द्रता ९५ टक्के होती. ती सायंकाळी ९७ टक्केवर पोहोचली.
ठिकठिकाणी झाडे पडली
शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे सक्करदरा पॉवर हाऊसजवळ झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तसेच महाल भागातील शिंगाडा मार्केट येथे झाड पडले होते. अग्निशमन व उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले झाड तोडून वाहतूक सुरळीत केली. शहराच्या अन्य भागातही काही ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आहे.
घरात व अपार्टमेंटमध्ये पाणी तुंबले
जोराच्या पावसामुळे भांडेवाडी मेट्रो स्टेशनजवळील घरांत पाणी तुंबले होते. तसेच प्रतापनगर येथील शिवगृह अपार्टमेंटमध्ये पाणी तुंबले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी पंपाच्या साहाय्याने तुंबलेले पाणी बाहेर काढले. खोलगट भागातील अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी तुंबल्याचे कॉल अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाकडे आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रस्ते, वस्त्यांत पाणीचपाणी पण अग्निशमनकडे कॉल नाही
- सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. शहरातील बहुसंख्य भागातील रस्ते व सखल भागातील वस्त्यांत पाणी साचले होते. मात्र मनपाच्या अग्निशमन विभागातील नियंत्रण कक्षाकडे कॉल आला नाही. तर रविवारी रात्री पाणी तुंबल्याचे डझनभर कॉल होते.
- नेहमीप्रमाणे नरेंद्र नगर पूल, मनीष नगर अंडरपास, लोहापूल, काचीपुरा, बजाज नगर, पडोळे चौक, प्रताप नगर, शंकर नगर चौक, अलंकार टॉकिजसमोर, अंबाझरी रोड, टिळक नगर, मानेवाडा रोड, डब्ल्यूएचसी रोड, एलआयसी चौक, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स आदी प्रमुख मार्गांवर पाणी भरले होते. दुुपारची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
- उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरातील अविकसित ले-आउटमध्ये रस्त्यावर चिखल साचल्याने लोकांना व वाहनचालकांना त्रास झाला.
- मान्सूनच्या पावसाचा आनंद लुटणाऱ्यांचीही कमी नव्हती. अंबाझरी, फुटाळा तलावावर युवकांची गर्दी दिसून आली. सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला.
- सिव्हिल लाईन येथील मनपा मुख्यालयात पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी चेंबरचे झाकण काढावे लागले. एकूणच जोराच्या पावसापुढे मनपा प्रशासन हतबल दिसून आले. चेंबर तुबल्याने डझनभर तक्रारी होत्या.