नागपूर : एकाच दिवसातील रुग्णसंख्येची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. रविवारी कोरोनाचे ८३२ तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या २१ रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,९७,५८८ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी १०,७६७ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे प्रमाण ७.७ टक्के आहे. यातील शहरात झालेल्या ७,५७१ चाचण्यांमधून ७२३ तर ग्रामीणमध्ये झालेल्या ३,१९६ चाचण्यांमधून ८० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हाबाहेरील रुग्णांतही वाढ झाली. नव्या २९ रुग्णांची भर पडली. मागील ८ महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज ९६ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८४,१२० झाली असून याचे प्रमाण ९७.२९ टक्के आहे.
- ओमायक्रॉनच्या रुग्णांनी वाढवली चिंता
शहरात ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद १२ डिसेंबर रोजी झाली. त्यानंतर हळूहळू यात वाढ होताना दिसून येत आहे. ६ जानेवारी रोजी ६ रुग्ण आढळून आले असताना ९ जानेवारी रोजी २१ रुग्ण या व्हेरिएंटने बाधित असल्याचे पुढे आले. ‘डेल्टा’पेक्षा हा व्हेरिएंट तीन पटीने वेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
एनडीआरएफचे २२ जवान कोरोना संक्रमित
आपत्तीच्या काळात मदत कार्य करणारे एनडीआरएफचे २२ जवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सिव्हिल लाइन्स स्थित नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अकॅडमी येथे हे जवान प्रशिक्षण घेत होते. आता या जवानांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. एनडीआरएफमध्ये सध्या तीन ट्रेनिंग कोर्स सुरू आहेत. यात देशातील विविध भागांतून आलेले ९० जवान प्रशिक्षण घेत आहेत.
हे जवान जेव्हा प्रशिक्षणासाठी आले तेव्हाच त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्यांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आले तेव्हा ते पॉझिटिव्ह आढळून आले. २२ पॉझिटिव्ह जवानांपैकी चार जण अगोदरच संक्रमित आढळून आले होते. यानंतर शनिवारी १८ जवान पॉझिटिव्ह आले.
- सक्रिय रुग्णांची संख्या ३,३४५
नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३,३४५ झाली आहे. यात शहरातील २,८७१, ग्रामीणमध्ये ४४१ तर जिल्हाबाहेरील ३३ रुग्णांचा समावेश आहे. यातील १, ८४६ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर मेडिकलमध्ये १८, मेयोमध्ये ३, एम्समध्ये ३३, आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरणात २० व उर्वरित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत.