नागपूर : सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्णसंख्येचा ग्राफ उंचावत असताना शुक्रवारपासून मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरसंपावर गेल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे.
‘नीट’ पीजी प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने दिल्लीत निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नव्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने निवासी डॉक्टरांवर पडत असलेल्या कामाचा ताण याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला. आज मेयोमधील निवासी डॉक्टरांनी ओपीडीवर बहिष्कार टाकला. परंतु वॉर्डापासून ते शस्त्रक्रियागृहात सेवा दिली. तर, मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी ओपीडी व वॉर्डातील रुग्णसेवा बंद ठेवत अतिदक्षता विभाग (आयसीयू), शल्यक्रियागृह व कॅज्युअल्टीमध्ये रुग्णसेवा दिली. निवासी डॉक्टरांचे हे आंदोलन अनिश्चितकालीन आहे. यामुळे दोन्ही रुग्णांचा भार वरिष्ठ डॉक्टरांवर आला आहे.