लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकूचा धाक दाखवून रेल्वेच्या निवृत्त अधिकाऱ्यांची कार आणि रोख रक्कम असा ११लाखांचा मुद्देमाल पळवून नेणाऱ्या गुंडांच्या अवघ्या चार तासात मुसक्या बांधण्याची कामगिरी बेलतरोडी पोलिसांनी बजावली. अटक केलेले तीनही आरोपी गुन्हेगार व्यसनाधीन आहेत. सोनू खान मेहबूब खान (वय ३२,रा. यासिन प्लॉट, ताजबाग), शेख हमीद शेख बाबू (वय ३८, रा. ताज अम्मा कॉलनी, मोठा ताजबाग) आणि सचिन नारायणराव पारधी ( वय ३४, रा. प्रभातनगर, नरसाळा) अशी त्यांची नावे आहेत.फिर्यादी गंगाराम रामदास पोलालू (वय ६१) हे मानेवाड्यातील नाईक नगरात राहतात. ते रेल्वेचे निवृत्त अधिकारी आहेत. गुरुवारी दुपारी ते दर्शन करण्यासाठी हुडकेश्वरच्या मारुती देवस्थानात गेले होते. दर्शन करून परत येताना त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन ठिकाणी आपली कार थांबवली. तेवढ्यात आरोपी सोनू खान, शेख हमीद आणि सचिन तेथे आले. ‘भोले के प्रसाद के लिये पैसे दो,’ असे आरोपी म्हणाले. धोका लक्षात घेऊन गंगाराम आपल्या कारमध्ये बसत असल्याने आरोपींनी चाकू दाखवून मारण्याची धमकी दिली. गंगाराम यांना रोख रकमेची मागणी करून एक आरोपी त्यांच्या कारमध्ये बसला आणि दुसऱ्याने स्टिअरिंगचा ताबा घेतला. काही कळण्याच्या आतच आरोपी त्यांची कार घेऊन पळून गेले. तिसऱ्या आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि दुचाकीवरून पळून गेला. गंगाराम यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार विजय आकोत यांनी लगेच वरिष्ठांना माहिती देऊन वेगवेगळी पथके घटनास्थळी आणि आजूबाजूला आरोपींच्या शोधासाठी पाठविली. त्या भागातील नागरिकांनी आरोपी उमरेड रोडकडे पळून गेले, अशी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांची पथके तिकडे धावली. कळमना गावाजवळ एका निर्जन ठिकाणी आरोपींनी गंगाराम यांची कार सोडली. कारमधील ३५५ रुपये आणि मोबाईल घेऊन पळ काढला. कार नजरेत पडल्यावर पोलिसांनी त्या भागात नागरिकांना विचारपूस केली असता तेथून आरोपी पायी गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांच्या पथकांनी त्या भागात शोधमोहीम राबवून सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी सोनू खान आणि शेख हमीद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देतानाच तिसरा साथीदार सचिन पारधी याचीही माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी रात्री त्यालाही अटक केली. या आरोपींकडून गंगाराम यांची चोरलेली कार तसेच रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच चाकूसुद्धा पोलिसांनी जप्त केला.तिघेही सराईत गुन्हेगारपोलिसांनी अटक केलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना अमली पदार्थांचे व्यसन असून ते व्यसन भागविण्यासाठी नेहमीच गुन्हे करतात, अशीही माहिती ठाणेदार आकोत यांनी दिली. अवघ्या चार तासात लुटमारीच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्याची कामगिरी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय आकोत, द्वितीय निरीक्षक दिलीप साळुंखे, उपनिरीक्षक विकास मनपिया, हवालदार रणधीर देशमुख, तेजराज देवळे, गोपाल देशमुख, विजय श्रीवास, बजरंग जुनघरे, प्रशांत सोनूलकर, शिपाई कुणाल लांडगे, नितीन बावणे, निश्चय बढिये, दीपक तऱ्हेकर, मिथुन नाईक आणि मन्साराम वंजारी यांनी बजावली.
नागपुरात चाकूच्या धाकावर निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 9:27 PM