योगेश पांडे नागपूर - हंसापुरी परिसरात सोमवारच्या रात्री मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली व अनेकांच्या घरावरदेखील दगडफेक करण्यात आली. संबंधित हल्ला एकाच गटाच्या तरुणांकडून करण्यात आल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला होता व रात्रभर ते दहशतीतच होते. मात्र पोलिसांनी वेगळाच दावा केला आहे. हंसापुरीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला करत दगडफेक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातदेखील तेच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलिसांचा दावा खरा की स्थानिक रहिवाशांनी अनुभवलेला काळरात्रीचा अनुभव खरा असा सवाल उपस्थित होत आहे.
हंसापुरीतील जाळपोळ व हिंसाचार प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडूनच या गुन्ह्यात तक्रार करण्यात आली आहे. गुन्ह्यातील तपशीलानुसार रात्री दहा वाजता फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक हंसापुरीकडे रवाना झाले. तेथे एका गटाचे ४० तरुण तर दुसऱ्या गटाचे दीडशेहून अधिक तरुण एकमेकांवर दगडफेक करत होते. एका तरुणाला दुसऱ्या गटाने घेरून बेदम मारहाण केली व पोलिसांनी त्याला उपचारासाठी लगेच मेयो इस्पितळात पाठविले. तसेच होमगार्ड विपुल सोनवणे व आदर्श बगले यांना मारहाण करून त्यांच्या दुचाकी जाळल्या. पोलिसांनी या प्रकरणात दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्ह्यातील दावा प्रत्यक्षदर्शींच्या दाव्याशी मेळ खात नसल्याचे दिसून येत आहे.
तहसील पोलीस ठाण्यातून बराच वेळ मदतच मिळाली नव्हती असा आरोप स्थानिक रहिवासी तसेच भाजपचे आ.प्रवीण दटके यांनी केला होता. मात्र दाखल गुन्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी वेळेत पोहोचले होते असे नमूद आहे. त्याचप्रमाणे एकाच गटाकडून हल्ला केल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी मात्र दोन्ही गटांकडून हल्ला झाल्याची भूमिका मांडली आहे.
सीआयएसएफच्या असिस्टंट कमांडंटलादेखील फटकादरम्यान, सोमवारच्या दंगलींमध्ये सीआयएसएफच्या असिस्टंट कमांडंटलादेखील फटका बसला आहे. विकासकुमार झा असे त्यांचे नाव असून ते घटनेच्या वेळी युपी १६ जी ०८७५ या वाहनाने तेथून जात होते. भगवाघर चौकात जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक करत तोडफोड केली.