लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला ५ मे रोजी सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. गेल्या दहा दिवसात या नद्यांचे ११ किलोमीटर लांबीचे पात्र स्वच्छ करून ३४ हजार ९८ टन गाळ व कचरा काढण्यात आला आहे. पोरा नदीतून सर्वाधिक १९४९०.४ टन गाळ व कचरा काढण्यात आला. नागनदीतून ८५८४.८ टन तर पिवळी नदीतील ६०२४ टन गाळ काढण्यात आला आहे.५ जूनपूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्याने गाळ व कचरा काढण्यासाठी १४ पोकलेनचा वापर केला जात आहे. स्वच्छता अभियानात सहभागी विविध संस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे पोकलेन नाही. त्यांनी पोकलेनचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. नागनदीतील गाळ काढण्यासाठी ५, पिवळी व पोरा नदीतील गाळ काढण्यासाठी प्रत्येकी ४ पोकलेनचा वापर केला जात आहे. तसेच शहराच्या हद्दीबाहेरील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी एका पोकलेनचा वापर केला जात आहे.नागनदी व पोरा नदी पात्रातील काढलेला गाळ टिप्पर व ट्रकमधून दुसरीकडे वाहून नेला जात आहे. नागनदीपात्रातून काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी टिप्परच्या ४२५ फेऱ्या तर पोरा नदीतील गाळाच्या ६८३ फेऱ्या केलेल्या आहेत. अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.अभियानाच्या सुरुवातीला पाच पोकलेन होते. त्यामुळे अभियानाला गती आली नव्हती. आयुक्त अभिजित बांगर यांनी पोकलेनची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले होेते. त्यानुसार ही संख्या वाढविण्यात आली आहे. शहराच्या मध्यातून वाहणाºया नागनदीचे स्वच्छता अभियान २०१३पासून राबवण्यात येत आहे. या नदीच्या किनाºयावर ३६ झोपडपट्ट्या आहेत. पावसाळ्यात तेथे पाणी शिरण्याचा धोका असतो. अशीच परिस्थिती पिवळी व पोरा नदी काठावरील वा लगतच्या वस्त्यातील आहे. नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. १८ किलोमीटर लांबीच्या नागनदीच्या पात्राचे विविध टप्प्यात विभाजन करून महापालिकेने स्वच्छता अभियान हाती घेतले.यशवंत स्टेडियमजवळ रविवारी नागनदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. अंबाझरी ते पंचशील टॉकीज, पंचशील टॉकीज ते अशोक चौक, अशोक चौक ते केडीके महाविद्यालय, केडीके महाविद्यालय ते पिवळी नदी संगम असा नागनदी स्वच्छतेचा मार्ग आहे. पोरा नदी स्वच्छता अभियानाला सहकार नगर घाटापासून सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात पोरा नदीला पूर आल्याने या भागात पुराची पाणी शिरले होते. त्यामुळे नदी स्वच्छता अभियान राबविताना संपूर्ण पात्रातील गाळ व कचरा काढण्याची गरज आहे.अभियानासाठी १० एक्झिक्युटिव्ह ग्रुपशहरातील नद्यांच्या स्वच्छतेकरिता एकूण १० एक्झिक्युटिव्ह ग्रुप तयार करण्यात आले असून त्यात कार्यकारी अभियंता हे चमूप्रमुख आहेत. या ग्रुपमध्ये सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, झोन स्तरावरील आरोग्य अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. झोनस्तरावर जबाबदारी विभाजित करण्यात आली आहे. नद्या स्वच्छता अभियानासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे.