लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या शस्त्रपूजनावरुन विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र यंदाच्या पत्रिकेत जरी उल्लेख नसला तरी दरवर्षीच्या परंपरेनुसार शस्त्रपूजन होणारच असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व बाल अधिकारासाठी कार्यरत असलेले व ‘नोबेल’ पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या उपस्थितीत विजयादशमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका, देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.शस्त्रपूजन ही तर परंपराचशस्त्रपूजनावरुन सुरू असलेल्या वादासंदर्भात संघाकडून अधिकृत कुणीही बोललेले नाही. मात्र शस्त्रपूजन ही आपली भारतीय परंपरा राहिली आहे. कुणाला नुकसान पोहोचविण्यासाठी ही शस्त्रे नसतात. घरांमध्ये शस्त्रे, विविध कामासाठी अवजार ठेवण्यात येतात. त्यांचे विजयादशमीला पूजन करण्यात येते. यात गैर काहीच नाही, अशी भूमिका एका संघ पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर मांडली.सोहळ्याचे होणार ‘वेबकास्टिंग’देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा पाचवा तर पुढील लोकसभा निवडणुकांच्या अगोदरचा अखेरचा विजयादशमी उत्सव असेल. संघाच्या शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.‘व्हीव्हीआयपी’ येणारदरम्यान, विजयादशमीच्या कार्यक्रमाला रेशीमबागच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशातील विविध नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ‘व्हीव्हीआयपी’ मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरू आहे.