लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारची कागदपत्रे हरविल्यामुळे ती नव्याने काढून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) दलालाने एका वाहनचालकाला ५,७०० रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गोपाल सावजी वानखेडे (वय ५०, रा. छावणी) नामक दलालाला शनिवारी दुपारी अटक केली.तक्रारदार वाहनचालक शासकीय नोकरीत असून, ते भानखेडा-टिमकी परिसरात राहतात. त्यांच्या ऑल्टो कारची कागदपत्रे काही दिवसांपूर्वी गहाळ झाली. त्यामुळे त्यांना कागदपत्रांची दुय्यम प्रत काढायची होती. त्यासाठी त्यांनी अमरावती मार्गावरील आरटीओ कार्यालय गाठले. तेथे घुटमळणारा दलाल गोपाल वानखेडे याने त्यांना काय काम आहे, अशी विचारणा केली. तक्रारदाराने काम सांगताच आपली आरटीओमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत सेटिंग असल्याचे सांगून तातडीने काम करून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने रक्कम जास्त होते, असे म्हटले असता आरोपी वानखेडेने यातील ८० टक्के रक्कम आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तर केवळ २० टक्के रक्कम आपल्याला मिळते, असे सांगितले. लाच दिल्याशिवाय काम होणे शक्यच नसल्याचेही तो म्हणाला. त्यावरून तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज आरटीओ कार्यालय परिसरात सापळा लावला. तक्रारदाराने वानखेडेला गाठून पैसे देण्याची तयारी दाखवताच त्याने ५,७०० रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी आजूबाजूला घुटमळणाऱ्या एसीबीच्या पथकाने आरोपी वानखेडेच्या मुसक्या बांधल्या. सीताबर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.ते दोघे कोण?सूत्रांच्या माहितीनुसार, वानखेडेने ही लाच आरटीओतील दोन व्यक्तींसाठी घेतल्याचे सांगितले जाते. कारवाईची गडबड झाल्याने ते दोघे तूर्त बचावले. वानखेडेला पकडल्यानंतर त्यानेच ही माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. मात्र ते दोघे कोण होते, त्याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कळू शकले नाही. हे दोघे अधिकारी आहेत की कर्मचारी, त्याबाबतही अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले. दरम्यान, आरटीओतील एन्ट्री नंतर आता नितीन नामक दलालाने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरू केलेली इन्शुरन्स एन्ट्री चर्चेत आली आहे. लवकरच नितीन दलाल आणि त्याच्या साथीदारांवर नाट्यमय कारवाई होण्याचे संकेत आहेत.