लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरातील शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) घोटाळा समोर आणल्यामुळे खळबळ उडाली आहे. परिवहन आयुक्त यांनी या प्रकरणाची चौकशी न करताच ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला त्याचा त्रास असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा, अशा सूचना आरटीओला दिल्या आहेत, हा अजब प्रकार असल्याचे शिवसेना शहर समन्वयक नितीन तिवारी यांचे म्हणणे आहे.तिवारी म्हणाले, २२ मार्च २०१८ रोजी शहर आरटीओ कार्यालयात लर्निग लायसन्स घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आणले. या संदर्भात तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांना निवेदन दिले. परंतु आरटीओे कार्यालयाकडून कारवाई झाली नाही. यामुळे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्री व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, परिवहन आयुक्त व दक्षता परिवहन कार्यालयाला निवेदन दिले. ‘व्हीआयपी मोड’चा दुरुपयोग करून लायसन्स देण्याचा हा प्रकार होता. परिवहन आयुक्तांनी दोषीच्या विरोधात चौकशी पूर्ण केली नाही. केवळ सहायक मोटार वाहन निरीक्षक मंगेश राठोड या अधिकाऱ्यांचे निलंबन केले. हेच आरोप अभिजित खरे आणि संजीवनी चोपडे व इतर अधिकाऱ्यांवर होते. परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट प्रकरण दाबण्यासाठी तिवारी यांचा त्रास असल्यास त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा व त्याची एक प्रत परिवहन कार्यालयतही देण्याचा सूचना दिल्या. आरोप करणाऱ्यावरच दबावतंत्राचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर आरटीओ : लर्निंग लायसन्स घोटाळ्याची चौकशी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:42 PM