नागपूरच्या सदर पोलिसांवर सूडबुद्धीचा आरोप : हायकोर्टात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:16 PM2017-12-22T20:16:26+5:302017-12-22T20:18:34+5:30
सदर पोलिसांवर सूडबुद्धीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सदर पोलिसांवर सूडबुद्धीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
गेल्या १७ आॅक्टोबर रोजी सदर पोलिसांनी संजय मिश्रा यांच्या तक्रारीवरून हिरा लक्ष्मी अॅन्ड कंपनीचे प्रोप्रायटर वेदप्रकाश ऊर्फ अप्पू वाधवानी व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३८७ व १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदविला. ही कारवाई सूडबुद्धीच्या भावनेतून करण्यात आल्याचा दावा वाधवानी यांनी केला आहे. तसेच, हा एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने शुक्रवारी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाधवानी यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास मनाई केली आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस आयुक्त, सदर पोलीस निरीक्षक व संजय मिश्रा यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
मिश्रा यांनी १९९४ मध्ये वाधवानी यांच्याकडून ३३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी मिश्रा यांची कोऱ्या स्टॅम्प पेपपरवर स्वाक्षरी घेण्यात आली होती. त्यानंतर त्या स्टॅम्प पेपरचा दुरुपयोग करून मिश्रा यांची जमीन बळकावण्यात आली असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. वाधवानी यांनी हा एफआयआर वाईट हेतूने नोंदविण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिश्रा यांच्यासोबतचा वाद आधीच संपला आहे. मिश्रा यांनी स्वत: याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण होतो असे वाधवानी यांनी स्पष्ट केले आहे. वाधवानी यांच्यातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.