योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मागील आठवड्याभरात आलेल्या चार कमी तीव्रतेच्या भूकंपांमुळे नागपुरात विविध अफवांना उधाण आले होते. मात्र भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण कार्यालयाने नागपुरकरांना दिलासा देणारा मोठा दावा केला आहे. नागपुरात आणखी लहान भूकंपांची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मोठ्या भूकंपांपासून नागपूर सुरक्षित असल्याची भूमिका कार्यालयाने मांडली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२४ ते एप्रिल २०२४ दरम्यान अशा प्रकारचे सहा छोटे भूकंप नोंदविल्या गेले होते.
३ मे ते ९ मे या कालावधीत नागपूर व परिसरात कमी तीव्रतेचे भूकंप नोंदविल्या गेले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता २.४ ते २.७ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) द्वारे प्रसिद्ध केलेल्या सिस्मोग्राफमध्ये मागील भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. हे धक्के कुणालाही जाणवले नाहीत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या भूकंप प्रवण क्षेत्राच्या नकाशात नागपूर क्षेत्राचा समावेश भूकंपासाठी कमी संवेदनाक्षम असलेल्या झोन-दोन अंतर्गत येते. मोठ्या भूकंपांपासून नागपुर क्षेत्र हे तुलनेने सुरक्षित मानले जात असले तरी या भागात छोटे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याअगोदरदेखील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने भूकंपांबाबत वेळोवेळी अभ्यास करून अहवाल जारी केले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण कार्यालय या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे अपर महासंचालकांनी स्पष्ट केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी लवलेश कुमार सोनी यांनी दिली.
भूकंपांच्या मॅपिंगचा अभ्यास सुरू
स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य क्षेत्राकडून नागपुरात क्षेत्रीय तपास होण्याची शक्यता आहे. भूगर्भशास्त्रज्ञ सविस्तर अभ्यास करून या कमी तीव्रतेच्या भूकंपाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतील. सद्यस्थितीत शास्त्रज्ञ या भूकंपांचे मॅपिंग आणि संवेदनशीलता यावर सतत काम करत आहेत.