लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलगी बनण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या शाळकरी मुलाशी थापेबाजी करून त्याच्याकडून त्याच्या घरातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आणि नंतर त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अखेर लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. रेहाना धनीराम धनावत (वय १८, रा. जुनी मंगळवारी), इमरान शरीफ असलम शरीफ (वय २४), फारुख शेख रशीद (वय २४, रा. बगडगंज) आणि प्रशांत सुभाष जांगडे (वय २६, रा. श्रावणनगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३२ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. या कारवाईनंतर पोलिसांनी आज शनिवारी या खळबळजनक प्रकरणाची माहिती उघड केली.पीडित मुलगा (वय १४) सदरमधील एका नामवंत शाळेत आठवीत शिकतो. तो सधन परिवारातील आहे. आरोपी रेहाना धनावतसोबत त्याची ओळख होती. मुलाला मुलगी बणन्याची भारी हौस होती; मात्र कसे बनायचे, हा त्याच्यापुढे प्रश्न होता. त्यामुळे त्याने रेहानाजवळ काही महिन्यांपूर्वी आपली इच्छा बोलून दाखविली. रेहानाने त्याच्या अजाणतेपणाचा गैरफायदा उठवत तुझे मुलीत परिवर्तन करून देतो,असे म्हणत त्याची आरोपी इमरान, फारुख आणि प्रशांतसोबत भेट घालवून दिली. आरोपींनी त्याला आपल्या जाळ्यात ओढले. तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते; मात्र त्यासाठी तुला मोठ्या रकमेची व्यवस्था करावी लागेल, असे सांगितले. तुझ्या पालकांना हे माहीत पडले तर तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, असेही आरोपींनी त्याला सांगितले. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुलाकडे त्याची आत्या आली होती. तिचे आणि पालकांचे दागिने कपाटातील लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती मुलाला होती. त्याने आरोपीनेसांगितल्याप्रमाणे ७ आॅगस्टच्या सायंकाळी ५.३० वाजता अंदाजे ५० ते ५५ तोळे दागिने आणि वडिलांचा महागडा मोबाईल घेऊन घरातून पळ काढला.तो बेपत्ता झाल्याने आणि सोबत घरातील मोठ्या प्रमाणात सोने चोरीला गेल्याने हादरलेल्या पालकांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलाच्या अपहरणाचा संशयही तक्रारीत नमूद केला. पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगत प्रकरणाची चौकशी सुरू केली.चौकशीदरम्यान मुलगा मुंबईतील वाशी भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे एक चौकशी पथक चार दिवसांपूर्वी मुंबईला रवाना करण्यात आले. वाशीतील कोपरखैर भागात मुलगा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या बांधल्या. आरोपींना अटक करून त्यांच्या मुसक्या बांधल्यानंतर पोलिसांनी त्यांचा न्यायालयातून पीसीआर मिळवला. त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना ३२ तोळे सोने मिळाले. ते जप्त करण्यात आले. उर्वरित सोने आरोपींनी मौजमजेत उडविले. त्यांनी पीडित मुलाचे अपहरण करून त्याला मुंबईला नेल्याचेही स्पष्ट झाले.आणखी असेच गुन्हे?आरोपींची वृत्ती आणि गुन्ह्याची पद्धत बघता त्यांनी आणखी अशाच प्रकारे गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यांची पोलीस चौकशी करीत आहेत. दरम्यान, ही प्रशंसनीय कामगिरी पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक राखी गेडाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.