वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर प्रस्तावित ‘सी-प्लेन’च्या ‘टेक आॅफ’चा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरपासून ‘सी-प्लेन’ची सेवा सुरू होण्याची शक्यता असून नागपूर सुधार प्रन्यासच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला हिरवी झेंडी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विमानाचे ‘टेक आॅफ’ व ‘लॅन्डिंग’साठी नागपुरातील अंबाझरी, कोराडी अथवा गोरेवाडा यापैकी एका तलावाची निश्चिती होणार आहे. नासुप्रची बैठक झाल्यानंतर लगेच ‘एमएमबी’कडून (महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड) निविदा काढण्यात येतील. या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील बैठकीत उड्डाणाचे स्थान निश्चित करण्यात आले होते. यात पेंच, ताडोबा यांच्यासमवेत शेगाव येथील आनंदसागरचादेखील समावेश आहे. सोबतच नजीकच्या भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली इतर स्थानेदेखील जोडण्यात येऊ शकतात. विशेष म्हणजे नागपूरचे वातावरण हे देशातील सर्व विमानतळांत ‘आॅल टाईम वेदर’ म्हणून ओळखले जाते. विमानांच्या दळणवळणासाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे. यासोबतच तलावांची संख्यादेखील जास्त असल्याने संचालनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
सामंजस्य करार होणार : अश्विन मुद्गलयासंदर्भात नासुप्रचे चेअरमन अश्विन मुद्गल यांना विचारणा केली असता या वर्षाअखेरीस ‘सी-प्लेन’ उड्डाण घेईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ‘एमएमबी’ खासगी ‘आॅपरेटर’च्या माध्यमातून ‘सी प्लेन’ला संचालित करेल. फायदा होत नसल्याच्या स्थितीत नासुप्र ‘गॅप फंडिंग’ करेल. सोबतच आवश्यक सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात येतील. ‘सी-प्लेन’च्या उड्डाणासाठी अंबाझरी, कोराडी किंवा गोरेवाडा यापैकी एका तलावाची निवड करण्यात येईल. ही निवड तांत्रिक व्यवहार्यतेच्या आधारवर होईल. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत सामंजस्य करार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.