नागपूर : पाच महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल १२ कोच कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.
सिकंदराबाद-हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेकडून १६ सप्टेंबर २०२४ पासून २० कोचची नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र पहिल्या दिवसांपासून या गाडीला प्रवाशांनी थंड प्रतिसाद दिला. अनेक कोच रिकामे ठणठण धावत असल्याने रेल्वेला जबर आर्थिक फटका बसला. पाच महिने होऊनही प्रवासी ५० टक्केही मिळत नसल्याने अखेर या गाडीच्या २० कोचपैकी १२ कोच कमी करून ही गाडी ८ कोचचीच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंजुरीची प्रतीक्षा
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचे १२ कोच कमी करून ८ कोचचीच चालविण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच हा निर्णय अंमलात आणला जाईल, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी आज दिली.
नागपूर-मुंबईचा प्रस्ताव
नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर सुपर फास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव विचाराधीन आहे. आगामी काळात दोन्ही मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. वंदे भारत स्लीपर सुपर फास्ट एक्स्प्रेसची एक महिन्यापूर्वीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुण्याजवळील दौंड लगत तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होताच वंदे भारत स्लीपर कोच धावण्यास सुरुवात होईल, असा विश्वासही विनायक गर्ग यांनी व्यक्त केला आहे