लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी वाडी येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेले २२०० लिटर स्पिरीट जप्त केले आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकाला अटक केली.प्रभाकर रंगारी (४२) असे आरोपीचे नाव असून तो पोलीस लाईन टाकळी येथील रहिवासी आहे. जप्त केलेल्या स्पिरीटची किंमत १.१० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.भरारी पथकाचे निरीक्षक डी.एस. जानराव शुक्रवारी पथकासह वाडी भागात पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान त्यांना वाडी येथील शिवाजीनगर येथील नागपूर-गोंदिया रोडवेजच्या गोदामात अवैध विक्रीसाठी स्पिरीट असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ या रोडवेजच्या गोदामावर धाड टाकली. धाडीत २०० लिटर क्षमतेच्या तीन ड्रमसह ६०० लिटर स्पिरीट जप्त केले. घटनास्थळावर कुणीही मिळाले नाही. त्यामुळे अज्ञात आरोपींविरुद्ध प्रकरणाची नोंद करण्यात आली. पथकाला पुन्हा सोनबानगर वाडी येथील घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट गोदामात स्पिरीटने भरलेले ड्रम असल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच घाटगे पाटील ट्रान्सपोर्टवर धाड टाकली. गोदामात आठ ड्रममध्ये १६०० लिटर स्पिरीट आढळून आले. गोदामाचे व्यवस्थापक प्रभाकर रंगारी या ठिकाणी उपस्थित होते. प्रभाकरला अटक करण्यात आली.ही कारवाई निरीक्षक जानराव यांच्या नेतृत्वात एम. के. मते, दुय्यम निरीक्षक विशाल कोल्हे, प्रकाश मानकर, राहुल सपकाळ, गजानन वाकोडे, प्रशांत घावले, विनोद डुंबरे आदींनी केली.
नागपुरात २२०० लिटर स्पिरीट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:07 AM
राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी वाडी येथील ट्रान्सपोर्टच्या गोदामावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेले २२०० लिटर स्पिरीट जप्त केले आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकाला अटक केली.
ठळक मुद्देघाडगे पाटील ट्रान्सपोर्टचा व्यवस्थापक अटकेत